जळगाव रोडवर ‘बेडूक उड्या’ मारत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:08 PM2019-01-23T14:08:57+5:302019-01-23T14:13:04+5:30
औरंगाबाद : जळगावला या जाणाऱ्या चौपदरी रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, दोन्ही बाजूंनी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना ‘बेडूक उड्यांचा’ प्रवास ...
औरंगाबाद : जळगावला या जाणाऱ्या चौपदरी रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, दोन्ही बाजूंनी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना ‘बेडूक उड्यांचा’ प्रवास करावा लागत आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या कामानिमित्त रोज अपडाऊन करणाऱ्यांच्या वाट्याला येतो आहे. औरंगाबाद ते सोयगावपर्यंत रोज किंवा दिवसाआड जाणाऱ्यांना पाठदुखी आणि धुळीच्या अॅलर्जीमुळे त्रास होतो आहे.
दरम्यान, मार्चअखेरपर्यंत फुलंब्रीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा एनएचएआयने केला आहे. औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यात ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट असून, चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी दिल्ली मुख्यालयाकडे २० हेलपाटे मारल्यानंतर गेल्या महिन्यात मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद ते सिल्लोड आणि अजिंठा ते जळगाव या दोन टप्प्यांतच मंजुरी मिळाली आहे. सिल्लोड ते अजिंठा या टप्प्यातील परवानगी अजून मिळालेली नाही.
नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली त्या रस्त्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचा मूळ प्रस्ताव द्विपदरीच होता. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजनाच्या दिवशी त्या रस्त्याच्या कामाला चौपदरीकरणाची तत्त्वत: मंजुरी दिली. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पूर्ण मंजुरी अजून दिलेली नाही.
मार्चअखेरपर्यंत फुलंब्रीपर्यंत रस्ता होईल
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एल.एस. जोशी यांनी दावा केली की, मार्चअखेरपर्यंत फुलंब्रीपर्यंतचा रस्ता पूर्ण होईल. २० बैठका झाल्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणास मान्यता मिळाली आहे. सिल्लोड ते अजिंठ्यापर्यंतच्या टप्प्याला अजून मान्यता मिळालेली नाही. या महिनाअखेरीस त्या टप्प्यालाही मान्यता मिळेल. उपलब्ध जागेत त्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. एनएचएआय आणि एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडीची नॅशनल हायवेची यंत्रणा द्विपदरी रस्ता करण्यासाठी तयार होती; परंतु जनरेट्यामुळे त्या रस्त्याचे काम चौपदरीकरणातून करण्याचे ठरले. मात्र, वाढीव निधीसाठी पूर्ण मंजुरी मिळाली तरच ते काम पुढे सरकेल.
रोज अपडाऊन करणारे काय म्हणतात...
महसूल प्रशासनातील अधिकारी सतीश देशमुख म्हणाले, रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी तासाभरात सोयगाव, सिल्लोडपर्यंत जाता यायचे. आता दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो आहे. सिल्लोड ते पालोदपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंतही तशीच परिस्थिती आहे. धूळ, खडी आणि नालीदार पद्धतीने रस्ता खोदल्यामुळे पाठदुखी मागे लागली आहे. मंडळ अधिकारी राजेंद्र बागडे म्हणाले, उड्या मारल्यागत प्रवास करावा लागतो आहे. कारमध्ये जा किंवा बसमध्ये त्रास होतो आहे. दुचाकीस्वारांचे हाल तर न विचारलेले बरे. धूळ आणि खडीमुळे धुके पडल्यासारखी परिस्थिती रोज निर्माण होते. चार ते पाच अपघात रोज होत आहेत. रस्त्याच्या कामाला किमान दोन वर्षे लागतील, असे सध्याची गती पाहून वाटते.
तीन टप्प्यांत मिळाली मंजुरी
पहिल्या टप्प्यात : ३०४ कोटी; दुसऱ्या टप्प्यात : २५० कोटी; तिसऱ्या टप्प्यात : ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. १ हजार कोटींपैकी सुमारे ६०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद झाली आहे. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता होणार आहे. शहरात आल्यावर रस्त्याची रुंदी वाढेल.