ट्रॅव्हल्स कंपनीला ठोठावला दंड
By Admin | Published: September 14, 2014 11:17 PM2014-09-14T23:17:39+5:302014-09-14T23:38:14+5:30
परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे.
परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची माहिती अॅड.अरुण खापरे यांनी दिली. त्यानुसार डॉ.श्रीनिवास कारले यांनी १७ फेब्रुवारी २०१३ रोजी परभणी ते नागपूर प्रवासासाठी ट्रव्हलयारी डॉट कॉमवरुन २३ व २४ फेब्रुवारी २०१३ चे नागपूर ते परभणी परतीच्या प्रवासाचे आरक्षण केले होते. या आरक्षणाची स्लीप घेऊन ते प्रवासासाठी निघाले असता त्यांना व त्यांच्या मित्रांना श्रीफल ट्रॅव्हल्स यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रवास करु दिला. परंतु, २४ फेब्रुवारी रोजी परतीच्या प्रवासादरम्यान श्रीफल ट्रॅव्हल्स यांनी डॉ.कारले व त्यांच्या मित्रांना नागपूर येथून संजय ट्रॅव्हल्स येथून आरक्षित सीटवर प्रवास करु दिला नाही. ही सीट आमच्या कार्यालयाकडून आरक्षित झालेली नाही, असे सांगून बसलेल्या जागेवरुन खाली उतरविले. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. नागपूर ते नांदेड असा उलटा प्रवास करुन बिना एसी त्रासदायक प्रवास करावा लागला. त्यामुळे याविरुद्ध डॉ.कारले यांनी जिल्हा ग्राहकमंचात ट्रॅव्हलयारी व श्रीफल ट्रॅव्हल्स यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
ग्राहकमंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून त्रुटीची सेवा दिल्याबद्दल २ हजार रुपये दंड व आरक्षित केलेल्या तिकिटांची रक्कम १८०० रुपये असा दंड ठोठावला. ग्राहक मंचचे अध्यक्ष निटूरकर व सदस्या अनिता ओस्तवाल यांनी हा आदेश दिला. अर्जदारातर्फे अॅड.अरुण खापरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)