आधुनिक तंत्रज्ञानाचा खजिनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:01 AM2017-12-25T01:01:33+5:302017-12-25T01:01:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संलग्न महाविद्यालय, विद्यापीठातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधक, चिकित्सक बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट आविष्कार रविवारी पाहायला मिळाला. थेट उमरग्यापासून ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पनाशक्तींचा वापर करीत विविध संशोधनांचे सादरीकरण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संलग्न महाविद्यालय, विद्यापीठातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधक, चिकित्सक बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट आविष्कार रविवारी पाहायला मिळाला. थेट उमरग्यापासून ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पनाशक्तींचा वापर करीत विविध संशोधनांचे सादरीकरण केले. निमित्त होते विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सवाचे. या महोत्सवात चार जिल्ह्यांतील तब्बल ४८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.
विद्यापीठात २३ ते २५ डिसेंबरदरम्यान नावीन्यपूर्ण विज्ञानाची माहिती, संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी फाईल आर्ट अॅण्ड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विभागासमोर आविष्कार महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचे रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. महोत्सवात पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी.चे संशोधक आणि पीएच.डी. अपूर्ण असलेल्या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनांचे सादरीकरण केले. यात विद्यार्थ्यांनी जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, संगणक क्रांती, उत्पादन तंत्रे, बेकारी, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या, महिला सबलीकरण, समलैंगिकता, जातपंचायत, फिमेल जेनिटल म्युटेशन, सौरऊर्जा, कॉर्बनडाय आॅक्साईड नियंत्रण, अन्नप्रक्रिया, कृषी पीक उत्पादन, आरोग्य शिक्षण, तणाव मुक्ती, मानवी मूल्ये, आजची शिक्षणपद्धती, औषधशास्त्र, पशुवैद्यकीय अशा विविध विषयांची आकर्षक मांडणी व नावीन्यपूर्ण माहितीचे सादरीकरण केले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधनाचे मूल्यमापन १८ परीक्षकांनी केले असून, यातील पात्र संशोधक विद्यार्थी सोमवारी (दि.२५) संशोधनाच्या आराखड्याचे सादरीकरण करतील. यातून उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले जाणार आहेत. बक्षीस मिळविणाºया ४८ विद्यार्थ्यांना राहुरी येथील कृषी विद्यापीठात होणाºया राज्यस्तरीय आविष्कार महोत्सवात सहभागी होता येणार आहे.
वातावरणात कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणात होत आहे, तरीही त्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आलेले आहे. याविषयीचे संशोधन रसायनशास्त्राचे संशोधक बालाजी मुळीक यांनी मांडले. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय प्लास्टिक, अपत्ती व्यवस्थापन यावरही अनेकांनी मोलाची माहिती सादर केली.
चिकित्सक वृत्तीतून संशोधनाचा उगम
संशोधन करण्यासाठी सूक्ष्म पातळीवर चिकित्सक दृष्टी असावी लागते. संशोधन काळ, वेळेनुसार सतत बदलणारे असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे सेवानिवृत्त उपसंचालक व शास्त्रज्ञ डॉ. विलास लचके यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विलास लचके यांच्या हस्ते रविवारी झाले. अध्यक्षस्थानी विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे होते. तर समन्वयक डॉ. भारती गवळी उपस्थित होत्या.
डॉ. लचके म्हणाले, व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या विविध गरजांची पूर्तता होण्यासाठी प्रत्येक गोष्टीत संशोधन होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी प्रचलित शिक्षण पद्धतीमधूनच सूक्ष्म संशोधनासाठी प्रयत्न केले पाहिजे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांना स्वविकासासाठी संशोधन अनिवार्य बाब झाली असल्याचेही डॉ. लचके म्हणाले. देशातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी विद्यार्थी, पालक, विद्यापीठ आणि सरकारने संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचेही डॉ. लचके यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. वाल्मीक सरवदे म्हणाले, विद्यार्थ्यांना आविष्काराच्या माध्यमातून संशोधनासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. महोत्सवातून आदर्श संशोधक घडण्यास मोठी मदत होईल.
समन्वयक डॉ. भारती गवळी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. पुुरुषोत्तम देशमुख यांनी केले. प्रा. प्रवीण यन्नावार यांनी आभार मानले. आविष्कार महोत्सवाकडे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह बहुतांश ज्येष्ठ प्राध्यापकांनी पाठ फिरविली. या अनुपस्थितीत डॉ. शशांक सोनवणे, प्रा. भगवान साखळे, डॉ. प्रभाकर उंदरे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. विनय लोमटे, प्रा. सोनाली क्षीरसागर, डॉ. भास्कर साठे, प्रा. प्रवीण यन्नावार, डॉ. बी. एन. डोळे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. दीपक पाचपटे आदी युवा प्राध्यापकांनी महोत्सवाचा भार यशस्वीपणे उचलला.
आज समारोप
आविष्कार महोत्सवाचा सोमवारी (दि. २८) समारोप होणार आहे. या महोत्सवात उत्कृष्ट संशोधनाचे सादरीकरण करणाºया विद्यार्थ्यांना परितोषिके देण्यात येतील. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता पद्मश्री डॉ. शरद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.