वर्षभरात ३२ हजार कर्करोग रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:15 PM2018-12-30T23:15:14+5:302018-12-30T23:16:20+5:30
राज्य कर्करोग संस्थेत वर्षभरात तब्बल ३२ हजार ५१९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले,
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेत वर्षभरात तब्बल ३२ हजार ५१९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर आंतररुग्ण विभागात ४ हजार ४२८ जणांवर उपचार झाले. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आणि वर्षभरात मिळालेल्या सुविधांमुळे रुग्णसेवेत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे.
सरत्या वर्षाच्या प्रारंभी कर्करोग रुग्णालयात पॅलेटिव्ह के अर बाह्यरुग्ण विभागाचे उद््घाटन झाले. कर्करोगाचे रुग्ण स्टेज चारला गेल्यानंतर सदर रुग्णाला रुग्णालयात दाखल न करताही घरच्या घरी कशाप्रकारे काळजी घ्यावी, यादृष्टीने पॅलेटिव्ह के अर ओपीडी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कर्करोग रुग्णालयाला शासनाकडून राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीला राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनासह भाभाट्रॉन-२ चे उद्घाटन झाले. भाभाट्रॉन-२ या यंत्रामुळे कर्करुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मोठी मदत झाली. वर्षभरात लिनिअर अॅक्सलरेटरद्वारे ८९५ रुग्णांना एकूण २२ हजार ३७५, तर कोबाल्टद्वारे ५१ रुग्णांना एकूण १ हजार २७५ किरणोपचार देण्यात आले.
रुग्णालयात मार्च महिन्यात बालरोग विभागात केमोथेरपीसाठी डे-केअर आणि त्यानंतर आंतररुग्ण वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला. राज्य कर्करोग संस्थेच्या दर्जामुळे विविध विभागांसाठी ३६२ पदांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. रुग्णालयाचा होणारा विस्तार आणि दाखल, अद्ययावत यंत्रे, यामुळे रुग्णालय आगामी कालावधीत आणखी सुसज्ज होईल आणि रुग्णसेवेत वाढ होईल.
६ वर्षांत अडीच लाखांवर रुग्ण
रुग्णालयात २०१८ मध्ये तब्बल ९८० मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, तर ६१० लहान शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. गेल्या ६ वर्षांत अडीच लाखांवर रुग्णांवर उपचार करण्यात आले.
महिनाभरात बांधकाम
शासकीय कर्करोग रुग्णालयाची अतिशय चांगली वाटचाल सुरू आहे. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. त्याचा निधीदेखील आला आहे. आगामी महिनाभरात बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आर्किटेक्टचे नियोजन झालेले आहे.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
आणखी सुसज्ज
रुग्णालयाच्या विकासाच्या दृष्टीने सरते वर्ष चांगले राहिले. यंत्रसामग्री दाखल होत आहे. बांधकामासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. आगामी कालावधीत रुग्णालय आणखी चांगले आणि सुसज्ज होईल.
- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय