उपचार मिळतात;पण समुपदेशन नाही
By Admin | Published: September 13, 2014 11:03 PM2014-09-13T23:03:36+5:302014-09-13T23:13:51+5:30
बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले.
बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले. मोठ्या आशेने गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयाची पायरी ओलांडतात. तेथे उपचारही होतात; पण समुपदेशन केले जात नाही. त्यामुळे डॉक्टरांवरील विश्वासालाच तडा जातो. वाढती रुग्णसंख्या, अपुरा स्टाफ अशा स्थितीतही रुग्णांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे आहे. डॉक्टरांनी उपचारासोबत समुपदेशन केले तर गैरसमज होणार नाहीत, असा सूर ‘लोकमत’ने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादातून उमटला.
या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे, जिल्हा रुग्णालयाच्या विधी सल्लागार अॅड. करुणा टाकसाळ, बालरोगज्ज्ञ डॉ. संजय जानवळे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. हनुमंत पारखे, परिचारिका संघटनेच्या तत्वशीला मुंडे, संगीता सिरसट, मयत वैभवचे आई- वडील रेखा महेंद्र गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.
‘रुग्ण व डॉक्टरांतील संबंध’ या विषयावर ‘लोकमत’ने हा परिसंवाद घडवून आणला. मयत वैभवचे वडील महेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, आमचा मुलगा वैभव यास मंगळवारी ताप आला होता. जिल्हा रुग्णालयातील गोळीने ताप लवकर थांबतो म्हणून आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्याऐवजी अरेरावीची भाषा केली. ‘कधीही यायला, तुमच्या बापाचा दवाखाना आहे का?’ अशा शब्दांत त्यांनी सुनावले. त्यानंतर आम्ही शेजारच्या वार्डात गेलो. तेथे नर्सने सलाईन लावून उपचार सुरु केले. त्यानंतर वैभवला थंडी वाजण्यास सुरु झाली. तो थंडीने कु डकुडू लागल्याने आम्ही दुसऱ्या रुग्णाकडील ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकले;पण त्याी थंडी काही कमी झाली नाही. त्यानंतर नर्सने दोन इंजेक्शन दिले. त्याचा थंडीताप कमी तर झालाच नाही उलट उलट्या सुरु झाल्या. आम्ही डॉक्टरांना बोलावलं;पण कोणीही फिरकले नाही. जवळच काही नर्स जेवण करत होत्या, त्या देखील आल्या नाहीत. एक डॉक्टर शेजारी रुग्ण तपासत होते. मी त्यांना म्हणालो, माझा मुलगा अत्यवस्थ आहे. त्याला पहा;पण ते म्हणाले, ती माझी केस नाही. इकडे अर्ध्या तासापासून ताप व उलट्यांनी फणफणणाऱ्या माझ्या वैभवने तडफडत प्राण सोडले. डॉक्टर व नर्सने वेळेच पाहिले असते तर कदाचित माझा मुलगा वाचला असता.
असा प्रसंग दुसऱ्यावर येऊ नये!
मयत वैभवच्या आई रेखा गायकवाड यांनी सांगितले की, बामचा वैभव गेला;पण असा वाईट प्रसंग इतरांवर येऊ नये. माझा मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच गेला आहे. त्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे.
आरोप तथ्यहिन
डॉ. हनुमंत पारखे म्हणाले, मंगळवारी संध्याकाळी वैभव गायकवाडला अॅडमिट केले होते. नर्सने सलाईन लावले. त्यावेळी डॉ. वर्धमान कोटेचा ‘आॅनकॉल’ होते. रात्री पाऊणेबारा वाजता काय झाले? माहीत नाही. मला रात्री १२:४५ वाजता आरएमओंचा फोन आला. त्यांनी सांगितले, तुम्ही तात्काळ ८ क्रमांकाच्या वार्डात जा. तेथे काही तरी समस्या आहे. मी गेलो, तेंव्हा गेलो त्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झालेला होता. तेथे त्याचे नातेवाईक व पोलीस होते. यावेळी नातेवाईकांनी मलाच दोषी धरले. खरे पाहता मी त्या दिवशी आॅनड्यूटी नव्हतोच. रुग्णाचा मृत्यू होणे ही बाब दु:खाची आहे. हे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. मात्र, माझ्यावरील आरोप तथ्यहिन आहेत. मी पदरमोड करुन अनेक रुग्णांना मदत केली आहे.
सेवेत सुसूत्रता हवी
तत्वशील कांबळे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात कामाचा ताण असतो हे खरेच आहे; परंतु आपतकालिन स्थितीत एनआरएचएम व आॅन कॉल डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. काही डॉक्टर आठ तास काम करतात, काही जण चार तासच करतात. त्यामुळे सुसूत्रता हवी. रुग्णसेवेत हलगर्जीपणा नको.
उपचाराची स्थिती कळालीच पाहिजे
सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे म्हणाले, वैभवच्या आई- वडिलांनी मोठ्या आशेने जिल्हा रुग्णालय गाठले. त्याच्या मृृत्यूला डॉक्टर जबाबदार आहेत का? नेमके काय झाले? हे तपासानंतर स्पष्ट होईलच;पण तो तडफडत असताना शेजारच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टराने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. रुग्णसेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना उपचारस्थिती सांगायलाच हवी.
वैभवच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजे. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हता वाढायला हवी. सिस्टीम तर बदललीच पाहिजे शिवाय नातेवाईकांचे समाधान होईल, इतका स्पष्ट संवाद असला पाहिजे, या निष्कर्षावर परिसवंदाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)