मराठवाड्यासह इतर ७ जिल्ह्यांतील रुग्णांवर औरंगाबादेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:32+5:302021-05-12T04:05:32+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून पुढे येत असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ...
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून पुढे येत असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नोंदविले. अहमदनगर, नाशिक, वाशिम, जळगाव, धुळे, पुणे, सोलापूर या सात जिल्ह्यांसह मराठवाड्यातील कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे रुग्ण औरंगाबादेत उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शहरातील कोरोनाच्या रुग्णांपैकी ११ टक्के म्हणजेच १ हजाराच्या आसपास रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील असून, त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, १२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली.
गेल्यावर्षी असलेल्या सुविधांच्या तुलनेत यावर्षी आरोग्य सुविधांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये ३,६२२ रुग्ण होते. सध्या ७ हजार ४५४ आहेत. त्यावेळी १ लाख ५७ हजार १५७ टेस्ट करण्यात आल्या होत्या. सध्या १० लाख ६ हजार १२७ टेस्ट करण्यात आल्या आहेत. १० हजार रुग्ण गतवर्षी बरे झाले होते. आजवर १ लाख २२ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. गेल्या लाटेत ४७४ मृत्यू झाले होते. यावर्षी २,७७९ मृत्यू झाले आहेत. १२ हजार ८५६ बेड होते. सध्या २० हजार २७९ बेड आहेत. ऑक्सिजन बेड १,७५९ होते, सध्या ३,२७० बेड आहेत. आयसीयू ४१२ होते. सध्या ९४८ आयसीयू बेड आहेत. व्हेंटिलेटरची संख्या २२८ वरून ५१५वर गेली आहे.
चौकट
१५ मेनंतर शासन आदेशानुसार सवलती
जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत असले तरी १६ मेनंतर लॉकडाऊनमध्ये सवलती देण्याबाबत शासन आदेशानुसारच निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. १५ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही.
कोरोना रुग्णांचा चढउताराचा आलेख असा
फेब्रुवारी २०२१ पॉझिटिव्ह प्रमाण
१२ ते १६ फेब्रुवारी ३.९६ टक्के
१६ ते २८ फेब्रुवारी १२ टक्के
--------------------
मार्च २०२१ पॉझिटिव्ह प्रमाण
१ ते १५ मार्च १७.४१ टक्के
१६ ते ३१ मार्च २६.५० टक्के
--------------------
एप्रिल २०२१ पॉझिटिव्ह प्रमाण
१ ते १५ एप्रिल १९ टक्के
१६ ते ३० एप्रिल १५.८४
---------------------
मे २०२१ पॉझिटिव्ह प्रमाण
१ ते १२ मे १२ टक्के