औरंगाबादच्या दंगलखोरांचे खासगी रुग्णालयात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:58 AM2018-05-26T01:58:37+5:302018-05-26T01:58:43+5:30
दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांवर पोलिसांनी प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या होत्या. त्यात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
औरंगाबाद : पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या दंगलखोरांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले असून, १९ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात दोन समुदायांत दंगल झाली. दंगलीत १० कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांवर पोलिसांनी प्लॅस्टिक गोळ्या झाडल्या होत्या. त्यात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. आतापर्यंत १९ जखमींची नावे पोलिसांना मिळाल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
सीसीटीव्हींचे फूटेज पोलिसांनी जप्त केले आहे. नष्ट केलेला डाटा पुन्हा मिळविण्यासाठी जप्त डीव्हीआर मुंबईतील कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. माहिती लपविणारी रुग्णालयेही पोलिसांच्या रडारवर आहेत, असे घाडगे यांनी सांगितले.