वैद्यकीय पदवी नसताना उपचार करून रुग्णांच्या जीवांशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दापाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 02:21 PM2020-11-05T14:21:21+5:302020-11-05T14:31:07+5:30
बोगस डॉक्टरविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाळूज महानगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी पंढरपुरात छापा मारून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला. या कारवाईत बिपलप मंडळ या डॉक्टराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा दवाखाना सील करण्यात आला आहे.
कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना सुरू करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी सकाळी तालुकास्तरीय समितीचे डॉ.प्रशांत दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे, संजय कुलकर्णी, आर. एस. वैष्णव, एम. पी. कांबळे आदींच्या पथकाने पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ सुरू असलेल्या अंजली क्लिनिकवर छापा मारला.
डॉ.मंडळ याच्या दवाखान्यात अॅलोपॅथी औषधीचा साठाही मिळून आला असून त्याच्याकडे पश्चिम बंगालची वैद्यकीय पदवी मिळून आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. मंडळ याला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.