वृक्ष प्राधिकरण समितीला डावलून औरंगाबाद महापालिकेची चिंचेच्या झाडावर कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:16 PM2018-04-26T23:16:34+5:302018-04-26T23:19:04+5:30
राज्य शासनाकडून कोट्यवधी झाडे लावण्याची दवंडी दिली जात असतानाच औरंगाबाद महापालिकेने गुरुवारी ७० वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडावर कु-हाड चालविली. वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी नसताना वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत पालिकेने शहानूरमियाँ दर्गा चौकातील हे झाड साफ करून टाकले.
औरंगाबाद : राज्य शासनाकडून कोट्यवधी झाडे लावण्याची दवंडी दिली जात असतानाच औरंगाबाद महापालिकेने गुरुवारी ७० वर्षे वयाच्या चिंचेच्या झाडावर कु-हाड चालविली. वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी नसताना वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत पालिकेने शहानूरमियाँ दर्गा चौकातील हे झाड साफ करून टाकले.
संग्रामनगर पुलावरून सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, रेल्वेस्टेशन, पैठण, वाळूजकडे ये-जा करणाऱ्या शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ आहे. या झाडामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हे झाड तोडले जावे, यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन आग्रही होते. मात्र, वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी याला विरोध केल्याने आजपर्यंत हे झाड तोडता आले नव्हते. सध्या आयुक्त नसल्याची संधी साधत पालिकेतील अधिका-यांनी गुरुवारी अचानक या झाडावर कुºहाड चालविली. यासाठी पालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जवळपास अर्धा डझन लाकूडतोड्यांचे पथक कुºहाड चालविण्यासाठी सज्ज होते.
मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी प्राधिकरण समितीच्या परवानगीनेच हे झाड तोडले असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्या बैठकीचे मिनिटस् आपल्याकडे असल्याचेही ते म्हणाले. हे कागद उद्या कार्यालयात पाहायला मिळतील, हे सांगायलाही पाटील विसरले नाहीत. मात्र, १४ सदस्यांच्या वृक्ष प्राधिकरण समितीतील वृक्षप्रेमी असलेल्या चार सदस्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता समितीने अशी कुठीच परवानगी दिली नसल्याचे उघड झाले. उलट जेव्हा जेव्हा हे झाड तोडण्याचा विषय आला त्यावेळी समितीच्या सदस्यांनी विरोध केला. तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतलेल्या बैठकीतही झाड तोडण्याला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे त्यावेळी झाड तोडण्याचा निर्णय थांबवावा लागला. आता आयुक्त नसल्याची संधी साधत या झाडावर कुºहाड चालविण्यात आल्याचे प्राधिकरण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. समितीचे सदस्य आणि मानद वन्यजीव सदस्य दिलीप यार्दी म्हणाले, ‘समितीचा झाड तोडण्याला कायम विरोध होता. आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात हा निर्णय घेतला असू शकतो.’ मात्र, प्रत्यक्षात प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय असा कुठलाच निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना नाहीत. सध्या तर पालिकेला आयुक्तच नाहीत. मग निर्णय घेतला कोणी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.............
अडीच हजार लोकांना प्राणवायू देणारे झाड
हे झाड दररोज दोन ते अडीच हजार लोकांना प्राणवायू द्यायचे. ३५ प्रकारचे कीटक, पक्षी, सरडे, फुलपाखरे, सूक्ष्म जीवजंतूंचा ते आश्रयस्थान होते. गेल्या दहा वर्षांपासून हे झाड तोडण्याची मागणी होती; परंतु वृक्ष प्राधिकरण समितीच्या काही सदस्यांनी याला विरोध केला होता. हा विरोध डावलून पालिकेने चिंचेवर कुºहाड चालविली.
- डॉ. कशोर पाठक, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती
.....................
मग वाहतुकीला अडचण कशी?
समितीतील सदस्यांचा विरोधच होता. त्यामुळे समितीने परवानगी देण्याचा प्रश्न येतच नाही. या झाडामुळे आतापर्यंत एकही अपघात झाला नसताना वाहतुकीला अडचण म्हणून त्यावर कुºहाड चालविणे किती योग्य?
- माधुरी आदवंत, नगरसेविका आणि सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती
..............
आम्हाला झाड वाचवायचेच नव्हते
काटने के बहाने हजार...
पेड काटने के बहाने हजार,
बचाने का एक बहाना तो समझ लेते...
उड्डाणपुलाची थोडीसी डागडुजी करून झाड वाचविता येऊ शकले असते. नागपूर, पुण्यात अशी अनेक झाडे वाचविली आहेत; पण आम्हाला ते करायचेच नव्हते.
- रवी चौधरी, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती
................