मराठवाड्यातील दुष्काळी भागात आढळला ‘ट्री फ्रॉग’
By | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:13+5:302020-12-06T04:00:13+5:30
जतन आवश्यक : परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले पुणे : चांगले पर्यावरण असलेल्या ठिकाणी झाडावरील बेडूक ‘ट्री फ्रॉग’ (पॉलीपेडेटस् मॅकुलॅटस ...
जतन आवश्यक : परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले
पुणे : चांगले पर्यावरण असलेल्या ठिकाणी झाडावरील बेडूक ‘ट्री फ्रॉग’ (पॉलीपेडेटस् मॅकुलॅटस प्रजाती) पाहायला मिळतो. हा बेडूक आडस (ता. केज, जि. बीड) या ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणीय मूल्य चांगले असून, या बेडकाचे जतन आवश्यक आहे. मानवाला उपद्रवी किडे, कीटक हा बेडूक फस्त करतो. म्हणून तो मानवासाठी उपयुक्त ठरणारा आहे. यापूर्वी कोकणातच हा बेडूक दिसत असल्याची नोंद आहे.
झाडावरील बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॅान ॲडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक दिसून येतो. कोकणात आंबोली परिसरात दिसतो, तर मराठवाड्यात हा क्वचित दिसून येतो. आतापर्यंत कोणाला दिसल्याची माहिती उपलब्ध नाही. या बेडकाला ‘चुनाम’ असेही नाव आहे. हा तामिळ शब्द आहे, तर संस्कृतमध्ये ‘चुर्ण’ म्हटले जाते. भिंतीवरदेखील हा बेडूक दिसतो. जंगलात किंवा एखाद्या ठिकाणी झाड आणि ओलावा असेल तर गावातही आढळून येतात. आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो.
झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकाराने आडव्या असतात, तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पट्टे असतात, जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उड्या मारण्यातच सामावलेली असते.
-----------------------------------बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे यांचे खाद्य असून, ते शेतकऱ्यांना उपयोगी ठरतात. यांना ‘चुनाम’ असेही म्हणतात. हा तामिळ शब्द आहे. हा भिंतीवर सहसा दिसून येतो. जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसतात.
- डॉ. के. पी. दिनेश, प्राणिसंशोधक, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था, पुणे.