फोटोसेशनपुरतीच होतेय वृक्षलागवड
By Admin | Published: July 5, 2017 11:38 PM2017-07-05T23:38:44+5:302017-07-05T23:39:39+5:30
हिंगोली : शासनाचा ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान सुरू आहे. त्यात हिंगोली जिल्ह्याला एकूण ७ लाख ६६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.
सुनील पाठक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाचा ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान सुरू आहे. त्यात हिंगोली जिल्ह्याला एकूण ७ लाख ६६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. बऱ्याच ठिकाणी वृक्ष करपून गेल्यामुळे फोटोसेशनपुरतीच लागवड केल्याचे बुधवारी केलेल्या स्टिंगमध्ये उघड झाले. एवढेच काय पालकमंत्र्यांनी लावलेले रोपटेही जिल्हा परिषदेला जोपासता आले नाही.
हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील विविध संस्था, शाळा महाविद्यालये, शासकीय विभागांनी वृक्ष लागवडीसाठी प्रतिसाद दिला. ७ जुलैपर्यंत तब्बल १० लाख वृक्ष लागवड होणार असल्याचा अंदाज वन व समाजिकरण वनिकरण विभागाने लावला आहे. त्या धर्तीवर एकट्या हिंगोली शहरात लागवड केलेल्या वृक्षाचे बुधवारी स्टिंग केले असता अनेक विभागांतर्फे लावलेले रोपटे वाऱ्यावर सोडल्याचे उघड झाले. यामध्ये पालिकेतर्फे मंगळवारा भागात लावलेली बरीच रोपटे गायब झाली. तर तर काही खड्ड्यांत पाणी साचल्याने रोपटेजळून गेल्याचे दिसून आले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात लागवड केलेल्या रोपट्यांची स्थिती बरी आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वृक्षलागवड केलेल्या भागातच गुरे चरताना दिसून आले. त्यामुळे रोपट्यांची काय स्थिती असेल, हे न सांगितलेलेच बरे. जिल्हा परिषद परिसरात लावलेल्या रोपट्यांच्या जाळ्या पडलेल्या स्थितीत होत्या. तर चक्क मंत्र्याच्या हस्ते लावलेली झाडेच जळून गेली असल्याचे दिसून आले. येथे केलेले खड्डे मात्र अजूनही वृक्ष लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागात रोपट्यांची स्थिती चांगली असली तरी त्यांना जाळ्याच नसल्याने वृक्ष वाढण्याची चिंता आहे. तहसील परिसरात मात्र उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर नावाचा फलक लावलेल्या रोपाचीच देखरेख केली जात आहे. इतर रोपांची मात्र पूर्णत: वाट लागल्याचे दिसून आले. जलसंपदा विभागाने लागवड केलेले रोपटेदेखील उघडेच आहेत. पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेली झाडे रोजच शेळ्या खावून जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयात वृक्षलागवडीच्या पूर्वसंध्येला मोठी झाडे तोडली. परंतु आता केलेल्या नव्याने लावलेल्या रोपट्यांची जोपासणा करणेही तेवढेच गरजेचे आहे. समाजकल्याण विभाग परिसरातील सभागृहाजवळ वृक्ष लागवड चांगली केली असली तरी जातपडताळणी विभागाच्या बाजूला मात्र झाडे उघडीच आहेत.
अजूनही वेळ गेलेली नाही. लावलेल्या रोपट्यांची योग्य ती काळजी घेतल्यास ते वाढण्यास मदत होईल. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही उक्ती सार्थ ठरेल. तर अजूनही बऱ्याच भागात रोपट्यांना जाळ्या न लावतातच लागवड केल्याचे दिसून आले. आजही वृक्ष लागवड केली की सेल्फी काढला जातो. नंतर त्याकडे कोणी साधे ढुंकूनही पाहात नाही. मोहिमेपुरते भरते येते अन् पुन्हा ग्लोबल वॉर्मिंगचे मेसेज मोबाईलवर पाठविण्यात धन्यता मानली जाते.