सिडको चौकात झाड उन्मळून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:27+5:302021-05-21T04:04:27+5:30
औरंगाबाद : सिडको चौकातील मोठे झाड बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५० मिनिटांनी कोसळले. लॉकडाऊन व रात्रीची वेळ असल्याने मोठा ...
औरंगाबाद : सिडको चौकातील मोठे झाड बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५० मिनिटांनी कोसळले. लॉकडाऊन व रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रुग्णाला दवाखान्यात दाखल करून घराकडे परतणारे दोघेजण बालंबाल बचावले आहेत.
झाड पडण्याच्या वेळेला सुमनांजली हॉस्पिटल येथे रुग्णाला अॅडमिट करण्यासाठी आलेले दोघेजण चिश्तिया कॉलनीतील रहिवासी नासिर शेख व मोबीन काजी हे परत जात असताना हे झाड कोसळले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे नासिर शेख व मोबीन काजी म्हणाले. यावेळी त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. भयभीत झालेल्या अवस्थेत त्यांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला.
रात्रीच्या नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी झाड पडल्याचा आवाज येताच तेथे धाव घेऊन या दोघांना झाडाखालून बाजुला घेत धीर दिला. कोणी पाणी दिले. त्यानंतर तेथून जाणारी वाहने दुसऱ्या बाजूने वळवून जाधवमंडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता सुरळीत केला. शहरातील रोडच्या बाजूच्या बहुतांश झाडांची मुळे वेळोवेळी होत असलेल्या खोदकामामुळे खिळखिळी होऊन झाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कमकुवत झालेली झाडे महापालिकेने लक्ष देऊन होणारे नुकसान टाळले पाहिजे, ही अपेक्षा तेथील उपस्थितांनी व्यक्त केली.
कॅप्शन ... १) सिडको चौकात झाड कोसळल्याने जखमी झालेला युवक २) सिडको चौकात बुधवारी मध्यरात्री उन्मळून पडलेले झाड.