औरंगाबाद ‘मध्य’मतदारसंघात २०१४ सारखा ‘ट्रँगल’; कट्टर शिवसैनिकांसोबत एमआयएमची लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:13 PM2024-10-24T12:13:50+5:302024-10-24T12:15:29+5:30
एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
-मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या २०१४ सारखा राजकीय ‘ट्रँगल’ आकार घेतोय. येथील राजकीय कुरुक्षेत्रात शिंदेसेनेकडून सर्वप्रथम प्रदीप जैस्वाल यांचे नाव जाहीर झाले. उद्धवसेनेकडून किशनचंद तनवाणी, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. २०१९ प्रमाणे यंदाही वंचित बहुजन आघाडी फॅक्टरही आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाने विधानसभा निवडणूक लढविली. याच मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले. राजकारणातील दिग्गज मंडळींना हा निकाल बुचकळ्यात टाकणारा होता. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
२०१४ आणि २०१९ मधील मतांची टक्केवारी
मध्य मतदारसंघात ३ लाख ६६ हजार ४३५ मतदार आहेत. हिंदू मतदान जवळपास ४५%, मुस्लीम मतदार ३८%, दलित समाजाचे १५.०%, इतर ३ % मतदान असल्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये इम्तियाज जलील ३२ % मतदान घेऊन निवडून आले. प्रदीप जैस्वाल २२.२,% किशनचंद तनवाणी यांनी २१.६ % मते घेतली. २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे प्रदीप जैस्वाल यांना ४२ %, एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५ % मते पडली. वंचितचे अमित भुईगळ यांनी १४ % मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला होता.
२०१४ मध्ये कोणाला किती मते
पक्ष-------उमेदवार-- -मिळालेली मते- -- --टक्केवारी
एमआयएम- इम्तियाज जलील----६१,८४३-------३२.८
शिवसेना---प्रदीप जैस्वाल----४१,८६१--------२२.२
भाजप--किशनचंद तनवाणी-----४०,७७०----२१.६
राष्ट्रवादी काँग्रेस- विनोद पाटील---११,८४२-----०६.३
बहुजन समाज पार्टी-संजय जगताप---११,०४८----५.९
मनसे---- राज वानखेडे-----६.२९१------३.३
काँग्रेस----एम. एम. शेख-----९,०९३-----४.८
२०१९ मध्ये कोणाला किती मते
पक्ष---उमेदवार-----मिळालेली मते- -टक्केवारी
शिवसेना- प्रदीप जैस्वाल----८२,२१७-----४२.६
एमआयएम- नासेर सिद्दीकी-----६८,३२५----३५.४
वंचित - अमित भुईगळ-------२७,३०२-----१४.१
राष्ट्रवादी काँग्रेस- कदीर मौलाना----७,२९०----३.८