विद्यापीठात भुजंगराव कुलकर्णी यांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:27+5:302021-02-26T04:04:27+5:30
औरंगाबाद : संपूर्ण आयुष्यभर मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे भुजंगराव कुलकर्णी होत. त्यांच्या ...
औरंगाबाद : संपूर्ण आयुष्यभर मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे भुजंगराव कुलकर्णी होत. त्यांच्या रूपाने मराठवाड्याचा आधारवड पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित शोकसभेत माजी कुलगुरु भुजंगराव कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ म्हणाले, मराठवाड्यातून विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे अनेकजण जन्माला आले. त्यामध्ये भुजंगराव कुलकर्णी यांचे नाव अजरामर राहील. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी म्हणाल्या, भुजंगराव कुलकर्णी यांनी कुलगुरू विद्या परिषद व कार्यकारिणी मंडळ सदस्य आदी पदे भूषविली असून त्यांची कारकीर्द सर्वांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहील.
शोकसभेचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमास वाणिज्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा मंडळ संचालक डॉ. योगेश पाटील, डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ. गणेश मंझा, डॉ. गोविंद हुंबे, प्रदीपकुमार जाधव, डॉ. प्रताप कलावंत, भागचंद ढगे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सध्या कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे ‘नॅक’ समितीसोबत परराज्यात तपासणीसाठी गेलेले आहेत. त्यामुळे भुजंगराव कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांना कुलगुरू यांच्या वतीने शोकसंदेश पाठविण्यात येणार आहे.