दुचाकीस्वारांनी लांबविले महिलेचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:12 PM2018-12-10T22:12:16+5:302018-12-10T22:12:52+5:30
दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरात घडली.
वाळूज महानगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरात घडली. या चोरीच्या घटनेमुळे महिला व नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
आशा बाळासाहेब वीर (रा.जिजाऊनगर) या गृहिणी असून, सोमवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या काही कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना शेजारी राहणाऱ्या नंदा कोल्हे या भेटल्या. या दोघी गप्पा मारत उभाअसताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील दोघा व्यक्तींनी त्यांच्याजवळ दुचाकी उभी केली. यावेळी पिवळा शर्ट परिधान केलेल्या व्यक्तीने आशा यांना पत्ता असलेली एक चिठ्ठी दिली.
त्यावरील पत्ता वाचत असताना क्षणार्धात त्या भामट्याने आशा यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आशा वीर व नंदा कोल्हे या दोघींनी आरडा-ओरडा केला. मात्र, दुचाकीवरुन आलेले चोरटे सुसाट पसार झाले. दरम्यान, दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी दोन-तीनदा या परिसरात चकरा मारल्या. दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्याने पांढरा तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पिवळा शर्ट परिधान केला होता. पाळत ठेवून मंगळसूत्र लांबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
गुन्हे शाखेकडून पाहणी
हेमंत जगताप या तरुणाने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, पोहेकॉ. पोहेकॉ. मच्छिंद्र ससाणे, पोहेकॉ.किरण गावंडे, गोविंद पचरणे, विजय पिंपळे आदींच्या पथकाने सायंकाळी घटनास्थळ गाठले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.