तिरंगाच प्रत्येकाच्या जिवनात परिवर्तन घेऊन येऊ शकतो : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 08:44 PM2018-09-17T20:44:29+5:302018-09-17T20:45:32+5:30
तिरंगाच प्रत्येकाच्या जिवनात परिवर्तन घेऊन येऊ शकतो. तोच एकात्मतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
औरंगाबाद : राष्ट्राविषयीचा अभिमान जोपासण्यासाठी प्रत्येकांच्या मनात राष्ट्रप्रेम असणे आवश्यक आहे. या राष्ट्रप्रेमाच्या जोरावर सिमेवर जवान तिरंग्याची रक्षा करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालुन पहारा देताता. हा तिरंगाच प्रत्येकाच्या जिवनात परिवर्तन घेऊन येऊ शकतो. तोच एकात्मतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स.भु. महाविद्यालय ते क्रांती चौकातील स्मृतीस्तंभापर्यंत ११११ फुटांची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल गंगावाल, अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, प्रदेशमंत्री अभिजित पाटील, देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव, स.भु. संस्थेचे सचिव अॅड. दिनेश वकिल, महानगर अध्यक्षा योगिता पाटील, कार्यक्रम प्रमुख उमाकांत पांचाळ आणि महानगरमंत्री शिवा देखणे उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामाच्या अत्याचार आणि भूमिकेमुळे मराठवाड्यासह कर्नाटक आणि तेलंगणाचा काही भाग स्वातंत्र्यापासून वंचित होता. या भागातील नागरिकांना उभारलेला लढा आणि तात्कालिन सरकारने एकसंघ देश ठेवण्यासाठी उघडलेल्या मोहिमेमुळे निजाम शरण आला. यामुळे हा दिवस अतिशय महात्वाचा आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रचेतना निर्माण करण्याचे काम अभाविप करत असते. तिरंगा हे आपल्या एकात्मतेचे प्रतिक असून, या तिरंग्यासाठी भारताचा प्रत्येक नागरिक, जवान आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असतो. या एकात्मतेच्या भावनेतुनच देशाचा, राज्याचा आणि व्यक्तीचा विकास होत असतो. हा विकास होण्यासाठीच ही तिरंगा पदयात्रेची चळवळी सुरु केली. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनीही मार्गदर्शन केले. प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी प्रस्ताविक केले. प्रा.योगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार उमाकांत पांचाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल गंगावाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तिरंगा यात्रा यशस्वी होण्यासाठी किशोर शितोळे, डॉ. योगिता होके पाटील, डॉ. सुरेश मुंडे, गोंविद देशपांडे, निखिल आठवले, शुभम स्रेही, सुबोध सहस्त्रबुद्धे, रामेश्वर काळे, रोहित कोतवाल, पुनम वराळे, प्राजक्ता जगधने आदींनी परिश्रम घेतले.
राष्ट्रगिताने झाला समारोप
अभाविपतर्फे आयोजित तिरंगा यात्रेचा समारोप क्रांती चौकातील स्मृतीस्तंभाजवळ राष्ट्रगिताने समारोप झाला. स. भु. संस्थेच्या मैदानावरुन ११११ फुट लांब असलेल्या तिरंगा पदयात्रेला सुुरुवात झाली. ही यात्रा निराजा बाजार मार्गे सावरकर चौक, विवेकानंद कॉलेज, सतीश मोटार्स, क्रांती चौकपासून स्मृतीस्तंभ अशी काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभाविपचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.