स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोस्ट तिकिटावर फडकला तिरंगा; किंमत होती साडेतीन आणा

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 14, 2024 12:39 PM2024-08-14T12:39:43+5:302024-08-14T12:42:11+5:30

भारताच्या तिरंगा झेंड्याचे डिझाइन बनविणारे पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने २००९ या वर्षी त्यांच्या जन्मदिवशी विशेष पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते.

Tricolor hoisted on independent India's first postage stamp; The price was three and a half | स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोस्ट तिकिटावर फडकला तिरंगा; किंमत होती साडेतीन आणा

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोस्ट तिकिटावर फडकला तिरंगा; किंमत होती साडेतीन आणा

छत्रपती संभाजीनगर : सर्व देशवासी बुधवारी १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. ७७ वर्षांपूर्वी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता, तेव्हा भारतीय पोस्ट विभागाने देशाची आन-बान-शान असलेल्या तिरंगा झेंड्याचे तिकीट प्रकाशित केले होते. हेच तिकीट स्वतंत्र भारताचे पहिले तिकीट ठरले.

तिकिटावर ‘जयहिंद’, ‘इंडिया’
भारतीय डाक विभागाची स्थापना १ ऑक्टोबर १८५४ या दिवशी झाली. १५ ऑगस्ट, १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. यानिमित्त तेव्हा डाक विभागाने तिरंगा असलेले पहिले तिकीट प्रकाशित केले. त्यावर फडकणारा तिरंगा झेंडा, स्वातंत्र्य दिनाची तारीख, ‘जयहिंद’ व इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे छापले.

साडेतीन आण्याच्या तिकिटाची किंमत हजारात
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या तिकिटाची किंमत साडेतीन आणा होते. आज ई-कॉमर्स साइटवर या तिकिटाची किंमत १ हजार रुपये दाखविली जात आहे. मात्र, ते तिकीट ओरिजनल मिळेल की नाही याची खात्री नाही.

तिरंगा डिझायनर पिंगली व्यंकय्या यांचेही तिकीट
भारताच्या तिरंगा झेंड्याचे डिझाइन बनविणारे पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने २००९ या वर्षी त्यांच्या जन्मदिवशी विशेष पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते. १९३१ या वर्षी अखिल भारतीय काॅंग्रेसच्या संमेलनात या केशरी, पांढरा व हिरवा रंग असलेल्या झेंड्याचा स्वीकार केला. व्यंकय्या यांनी चरखाचे चिन्ह टाकले होते, त्यात संशोधन करून ‘अशोकचक्र’ला स्थान देण्यात आले.

तिकिटांचा संग्रह
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पोस्ट तिकिटाचे संग्राहक सुधीर कोर्टीकर यांच्याकडे हा दुर्मीळ खजाना आहे. त्यातील १५ ऑगस्ट १९४७ चे पहिली तिरंगाचे पहिले तिकीट त्यांनी खास लोकमतच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: Tricolor hoisted on independent India's first postage stamp; The price was three and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.