किलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:34 PM2021-01-28T12:34:20+5:302021-01-28T12:36:59+5:30
Kilimanjaro अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते.
औरंगाबाद : प्रतिकूल वातावरण, घोंगावत जाणारे वारे, खडतर चढ आणि पडणारा बर्फ.. या खडतर परिस्थितीवर यशस्वी मात करीत औरंगाबादच्या अंबादास गायकवाड आणि नंदुरबार येथील अतुल वसावे यांनी मंगळवारी प्रजासत्ताकदिनी इतिहास रचताना आफ्रिकेतील सर्वोच्च उंचीवरील शिखर किलीमांजरो सर करीत तेथे तिरंगा फडकावण्याचा विक्रम केला.
अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते. या दोघांनी अतिशय खडतर परिस्थितीवर मात करीत २६ जानेवारी रोजी सकाळी सव्वाअकरा वाजता किलीमांजरो शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकावला. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांचा प्रचार जगभर होणार आहे, असे त्याचे प्रशिक्षक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले. किलीमांजारो हे आफ्रिकेतील टान्झानिया देशातील शिखर असून, त्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. या मोहिमेसाठी अंबादास गायकवाडने अनेक वर्षे खडतर सराव केला. त्याने याआधी लेहमधील कांगरी शिखर मोहीमही फत्ते केली आहे. तसेच गिर्यारोहणाचे शास्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. आगामी काळात अंबादासचे युरोप आणि आस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे. अंबादास गायकवाड ३६० एक्सप्लोअर ग्रुपद्वारे आयोजित या माेहिमेत किलीमांजरो शिखर मोहिमेत सहभागी झाला होता.
अशी कामगिरी करणारा एमआयडीसीचा पहिला कर्मचारी
अंबादास गायकवाड हा औरंगाबाद येथे एमआयडीसीत सेवेत असून, अवघ्या १६ वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याने अतिशय संघर्षपूर्ण परिस्थितीवर मात करीत आपली गिर्यारोहणाची आवड जपली आहे. किलीमांजरो शिखर मोहीम फत्ते करणारा तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पहिला कर्मचारी आहे. विशेष म्हणजे कर्ज काढून त्याने ही मोहीम फत्ते केली. याआधी औरंगाबादची एव्हरेस्ट शिखर मोहीम फत्ते करणारी मनीषा वाघमारे हिनेही किलीमांजरो शिखर सर केले आहे.
युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करणार
प्रजासत्ताकदिनी किलीमांजरो शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आतुर होतो. अतिशय प्रतिकूल वातावरणात आम्ही ही मोहीम फत्ते केली याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे.
- अंबादास गायकवाड, गिर्यारोहक, औरंगाबाद