फायनान्स कं पनीच्या कर्मचाऱ्याची दीड लाखांची बॅग लुटणारे त्रिकू ट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:05 AM2019-06-21T00:05:05+5:302019-06-21T00:05:48+5:30
फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाºयाच्या हातातील १ लाख ४५ हजार ५६५ रुपयांची रोकड आणि अकरा हजार रुपयांचा लॅपटॉप असलेली बॅग हिसकावून पळालेल्या तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी पकडले. घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळून लुटलेल्या रकमेपैकी १ लाख ४२० रुपये, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
औरंगाबाद : फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाºयाच्या हातातील १ लाख ४५ हजार ५६५ रुपयांची रोकड आणि अकरा हजार रुपयांचा लॅपटॉप असलेली बॅग हिसकावून पळालेल्या तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी पकडले. घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळून लुटलेल्या रकमेपैकी १ लाख ४२० रुपये, लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
शुभम ऊर्फ संभाजी ऊर्फ हवा शाम पिंपळे, अंबादास कचरू कोरे (रा. रोहतळे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि लखन ऊर्फ रवींद्र अशोक साळवे (रा. चित्तेपिंपळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. याविषयी ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, कॅनॉटमधील भारत फायनान्स लिमिटेड या कंपनीचा क्षेत्रीय सहायक विजय ऋषींदर माने हा तरुण नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी पिंप्रीराजा, आडगाव, घारेगाव येथील कंपनीच्या ग्राहकांकडून कर्ज परतफेडीच्या हप्त्याचे १ लाख ४५ हजार ५६५ रुपयांची रोकड एका बॅगेत ठेवून औरंगाबादला दुचाकीने परतत होता. त्यांच्या या बॅगेत अकरा हजार रुपयांचा लॅपटॉपही होता. निपाणी फाट्याजवळ विजय असताना मागून आलेल्या दुचाकीस्वार दोन जणांपैकी एकाने अचानक विजयच्या गळ्यातील पैशांची बॅग हिसकावून घेतली आणि अन्य एकाने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. या घटनेनंतर लुटारू तेथून पसार झाले होते. १९ जून रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, रतन वारे, श्रीमंत भालेराव, गणेश गांगवे, योगेश तरमाळे, नारायण कटकुरी, लहू थेटे, दीपक सुराशे यांनी तपास सुरू केला. तेव्हा ही लुटमार चितेपिंपळगाव येथे राहत असलेला शुभम ऊर्फ संभाजी ऊर्फ हवा याने केल्याचे समजले. संशयावरून पोलिसांनी शुभम ऊर्फ हवाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे साथीदार अंबादास कोरे आणि लखन ऊर्फ रवींद्र साळवे यांनी ही लुटमार केल्याचे सांगितले. यानंतर अंबादासला रोहतळे येथून तर लखनला चित्तेपिंपळगाव येथून पोलिसांनी अटक केली.
अन्.....गुन्ह्याची कबुली दिली
पोलिसांनी चौकशी करताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन लुटलेल्या रकमेपैकी १ लाख ४२० रुपये आणि लॅपटॉप पोलिसांना काढून दिला. शिवाय गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची मोटारसायकल आणि तीन मोबाईल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
‘त्या’ आरोपींनी केम्ब्रिज पुलावर आणखी एकाला लुटले होते
औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटांनी एप्रिल महिन्यात एका फायनान्स कंपनीच्या पिग्मी एजंटच्या दुचाकीला धक्का मारून सव्वालाखांची बॅग लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फायनान्स कंपनीचा पिग्मी एजंट सचिन कृष्णा निकम (रा. कॅनॉट प्लेस) हे एप्रिल महिन्यात पिंप्रीराजा, आडूळ आदी भागातील ग्राहकांकडून पैसे गोळा करून एका बॅगेत ठेवून ते झाल्टा फाटामार्गे शहरात मोटारसायकलने येत असताना केम्ब्रिज चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकीस्वार आरोपींनी त्यांना जोराचा धक्का देऊन खाली पाडले. यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील १ लाख २७ हजार ८३३ रुपयांची बॅग हिसकावून नेली होती. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. हा गुन्हा आरोपींनी केल्याची कबुली दिली. शहर पोलीस त्यांना लवकरच अटक करणार आहेत.