दुर्मिळ कासवाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड
By Admin | Published: November 6, 2014 01:21 AM2014-11-06T01:21:57+5:302014-11-06T01:38:05+5:30
औरंगाबाद : दुर्मिळ कासवाची तस्करी करणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून एका कासवासह कारही जप्त करण्यात आली.
औरंगाबाद : दुर्मिळ कासवाची तस्करी करणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून एका कासवासह कारही जप्त करण्यात आली. या कासवाची आंतरराष्ट्रीय बाजारात ४० लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
कारवाईबाबत पोलीस निरीक्षक व्ही. एच. हाश्मी यांनी सांगितले, काही जण दुर्मिळ जातीचे कासव विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्या माहितीवरून उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिराजवळ सापळा रचण्यात आला.
काही वेळातच खबऱ्याने सांगितलेल्या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार थांबली, त्यात कासव घेऊन आरोपी नाशिकला जाण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून आरोपींना पकडले.
गोल्डन ब्राऊन रंगाच्या व गुळगुळीत टणक टवकी असलेल्या या कासवाची विक्रीतून ४० लाख रुपये किंमत येणार होती. हे कासव कुठून आणि कोणी आणले हे पळून गेलेल्या आरोपींनाच माहिती असल्याने फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येत नाही, तोपर्यंत सत्यता पुढे येणे शक्य नाही.
४ अटक केलेल्या आरोपींचा या कासवात पाच जण मिळून ५० टक्के हिस्सा होता; परंतु तिघेही तोंड उघडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांशी या टोळीचे संबंध आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे.
४आरोपींविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात वन्यजीवांच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.