बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या सावत्र बापाला तिहेरी जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:26 PM2022-06-23T14:26:48+5:302022-06-23T14:27:57+5:30
अन्य कायद्यांखालीही सश्रम कारावास आणि दंड
औरंगाबाद : धमकी देत दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीसोबत वारंवार तोंड काळे करणारा तिचा सावत्र बाप कामेश जगन मते याला विशेष न्यायाधीश (पोक्सो) ए. एस. खडसे यांनी ‘पोक्सो’ कायद्याच्या विविध तीन कलमांखाली प्रत्येकी जन्मठेप (तिहेरी) आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. त्याचप्रमाणे न्यायालयाने विविध कायद्यांखाली आरोपीला विविध कालावधींचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. पीडितेला भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे शिफारस केली आहे.
१७ वर्षीय पीडित युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिने तिच्या पतीला दोन वर्षांपासून सोडून दिले असून, सध्या ती पीडित मुलगी व मुलासोबत राहते. एक दिवस कामेशने मुलीवर अत्याचार केला व याची वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या भावाला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. नेमका याचाच फायदा घेत मुलगी एकटी असताना तो दोन वर्षे धमक्या देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने मागील दाेन वर्षांची आपबीती आईला सांगितली. त्यानंतर दोघींनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. खटाणे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणी आणि शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता अरविंद पी. बागूल यांनी पीडिता आणि तिच्या आईसह पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पैरवी अधिकारी म्हणून कायंदे आणि रामदास सुरे यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी कामेशला ‘पोक्सो’च्या कलम ४, ५(१) आणि ५(एन) सह ६ अन्वये प्रत्येकी जन्मठेप आणि एक हजार रुपये दंड, याच कायद्याच्या कलम ८ अन्वये ७ वर्षे, कलम ९ (१) आणि ९(एन) अन्वये प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५०० रुपये दंड, भादंवि कलम ५०६ नुसार दोन वर्षे सश्रम कारावास आणि बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड ठोठावला.