शिवसागराच्या साक्षीने ‘छत्रपतींचा’ त्रिवार जयजयकार! क्रांतीचौकात अश्वारूढ पुतळ्याचे शानदार अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 12:01 PM2022-02-19T12:01:49+5:302022-02-19T12:06:21+5:30
महाराजांच्या पुतळ्यापासून चारही दिशांच्या १ कि.मी.हून अधिक अंतरापर्यंत असलेला हजारो शिवप्रेमींचा शिवसागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला.
औरंगाबाद : महापालिकेने क्रांतीचौकात साडेतीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chatrapati Shivaji Maharaj ) अश्वारूढ पुतळ्याचा शानदार अनावरण सोहळा शुक्रवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून आणि थ्रीडी लायटिंगच्या नेत्रदीपक प्रकाशझोतात पार पडला. संपूर्ण आसमंत आतषबाजीने उजळून गेला, तर लायटिंगच्या चौफेर प्रकाशाने क्रांतीचौक परिसर न्हाऊन निघाला. महाराजांच्या पुतळ्यापासून चारही दिशांच्या १ कि.मी.हून अधिक अंतरापर्यंत असलेला हजारो शिवप्रेमींचा शिवसागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. पुतळ्याचे अनावरण होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष करीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयजयकार केला.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. उदय राजपूत, संपर्कनेते विनोद घोसाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आदींची यावेळी उपस्थिती होती.
क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंच पुतळा असून, चौथऱ्यासह पुतळ्याची उंची ५२ फूट एवढी आहे. अनावरण सोहळा सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालला. विद्युत रोशनाईने क्रांतीचौकाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. चौकात उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून केली होती. त्यानुसार क्रांतीचौकात ५२ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील, असे जाहीर केले होते; परंतु ऐनवेळी निर्णय बदलला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. दानवे यांनी केले.