राष्ट्रीय स्पर्धेत साक्षीचा पदकांचा तिहेरी धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:16 AM2019-02-13T01:16:43+5:302019-02-13T01:17:02+5:30
राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे. साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे तिने ४ बाय १०० मीटर रिले धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.
औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे.
साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे तिने ४ बाय १०० मीटर रिले धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे. याआधी याच स्पर्धेत औरंगाबादच्या या अॅथलिटने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १२.५२ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघात औरंगाबादच्या साक्षी चव्हाण हिच्यासह मुंबईच्या सानिया सावंत, अहमदनगरची दिव्यांगी लांडे, मुंबईची त्रिवेणी तावडे यांचा समावेश होता. रिलेत रौप्यपदक हे तामिळनाडूला मिळाले आहे. गेल्या वर्षभरापासून आपला विशेष ठसा उमटवणाºया साक्षी चव्हाण हिने गतवर्षी डिसेंबरमध्ये तिरुपती येथील राष्ट्रीय स्पर्धेतही १४ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. याच स्पर्धेत साक्षीने केरळच्या मंजिदा नोव्हरीन हिचा राष्ट्रीय स्पर्धेतील १२.७३ सेकंदाचा विक्रम मोडीत काढताना १२.३८ ही नवीन वेळ नोंदवली होती. त्याचप्रमाणे तिने २०१८ मध्ये जानेवारी महिन्यात रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत २०० मी. मध्ये सुवर्ण व १०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकताना पदकांचा डबल धमाका केला होता. साक्षी चव्हाण ही सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिला प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व पूनम नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य राजाराम दिंडे यांनी साक्षी चव्हाण हिचे अभिनंदन केले.