तिप्पट पाऊस; त्यानंतरही प्रतीक्षा
By Admin | Published: July 28, 2016 12:31 AM2016-07-28T00:31:31+5:302016-07-28T00:50:31+5:30
उस्मानाबाद : मागील १ जून ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या २८१.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद : मागील १ जून ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या २८१.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा मागील वर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसाच्या सुमारे तिप्पट आहे. मागील वर्षी या कालावधीत ९५.५२ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी त्या तुलनेत चांगला पाऊस असला तरी तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याला आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
यंदा १ जूनपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मोठा पाऊस नसला तरी रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे अनेक भागातील पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना सुटला आहे. उस्मानाबाद तालुक्यात २२९.६९, तुळजापूर ३६२.९८, उमरगा ३४३.२०, लोहारा २८८.६६, कळंब २०५.५०, भूम २९२.८०, वाशी २६१.३४, तर परंडा तालुक्यात २७ जुलै पर्यंत २६८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यात १६.८८, तुळजापूर ७.१४, उमरगा ३२.२०, लोहारा १७.३३, कळंब ३०.३३, भूम २३.२०, वाशी २१.३३, तर परंडा तालुक्यात ७.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील जळकोट मंडळामध्ये २५ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर उमरगा आणि मुरूम येथे २० आणि २९ मि.मी. पाऊस नोंदविला गेला. लोहारा तालुक्यातील माकणी येथेही मंगळवारी ३५ मि.मी. पाऊस झाला. कळंब तालुक्याला जुलै महिन्यामध्येही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी कळंब भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. कळंब शहरात ५० मि.मी., शिराढोणमध्ये ५२, तर येरमाळा मंडळामध्ये ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. अशीच परिस्थिती भूम तालुक्यातही होती. तालुक्यातील आंबी येथे ५२ मि.मी., तर भूम शहरात २७ मि.मी. पाऊस झाला. वाशी शहरातही मंगळवारी ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, परंडा तालुक्यातील आनाळा मंडळात ३१ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. (प्रतिनिधी)