कंपनीत भाड्याने लावण्याच्या आमिषाने नेलेली सैनिकाची कार केली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:04 PM2019-10-14T21:04:44+5:302019-10-14T21:10:18+5:30
कार घेऊन गेल्यापासून आरोपीने एकाही महिन्याचे भाडे दिले नाही.
औरंगाबाद : कार दरमहा २५ हजार रुपये भाड्याने कंपनीत लावण्याच्या आमिषाने सैनिकासोबत करार करून नेलेली कार संबंधिताने गायब केली. सोबत कारच्या दुरुस्ती खर्चासाठी घेतलेली ७२ हजार ५०० रुपये सुरक्षा रक्कम आणि कारचे भाडेही दिले नाही. याविषयी १३ आॅक्टोबर रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
कवी दलमान प्रधान (रा. चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार अर्चना विजय ठोंबरे (रा. गाढेजळगाव) यांचे पती भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. विजय यांनी कार (एमएच-२० सीएच-३८०७) खरेदी केलेली आहे. ठोंबरे यांचे मित्र रामदास तुकाराम आव्हाड हे फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या ओळखीचा कवी प्रधान हा कंपनीत गाडी भाड्याने लावून देतो. संबंधित कंपनीकडून कारमालकास चांगले भाडे मिळते, असे सांगितले होते. १५ फेब्रुवारी रोजी आव्हाडसोबत आरोपी कवी प्रधान त्यांना भेटला. तेव्हा आरोपीने कारची कागदपत्रे पाहिली आणि त्याच्या बालाजी एंटरप्रायजेस कंपनीत दरमहा २५ हजार रुपये याप्रमाणे कार ३६ महिन्यांसाठी भाड्याने घेण्याची तयारी दर्शविली.
गाडी भाड्याने दिल्यानंतर वाहनचालक आणि गाडीतील इंधनाचा खर्च कंपनी करते. मात्र, अचानक कार नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीचा खर्च करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन कंपनीकडे ७२ हजार ५०० रुपये सुरक्षा अनामत (डिपॉझिट) ठेवावे लागेल, असे सांगितले. ठोंबरे यांनी आरोपी प्रधानला ७२ हजार ५०० रुपये दिले. ११ एप्रिल रोजी प्रधान ठोंबरे यांच्या घरी शंभर रुपयांच्या बॉण्डपेपरवर करारनामा घेऊन आला. या करारनाम्यात १ एप्रिल २०१९ ते १ एप्रिल २०२२ दरम्यान कार भाड्याने घेतल्याचा आणि ५० हजार रुपये डिपॉझिट असा मजकूर होता. यानंतर तो ठोंबरे यांच्याकडून कार घेऊन गेला.
ना भाडे दिले ना क ार
कार घेऊन गेल्यापासून आरोपीने एकाही महिन्याचे भाडे दिले नाही. यामुळे ठोंबरे यांनी त्याच्याशी संपर्क साधून कार आणि भाडे आणून देण्याचे सांगितले. मात्र, आरोपीने त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरत भाडे, डिपॉझिटची रक्कम आणि कार मिळणार नाही, असे सांगितले. फसवणूककेल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भागीरथ बोडखे यांनी अर्ज चौकशी करून रविवारी एमआयडी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला.