ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:52+5:302021-03-13T04:05:52+5:30
पाचोड : लोखंडाने भरलेला ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना पाचोडमधील पावन काशी विश्वेश्वर ...
पाचोड : लोखंडाने भरलेला ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना पाचोडमधील पावन काशी विश्वेश्वर मंदिरासमोर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ठार झालेल्या इसमाचे शिर धडावेगळे होऊन बाजूला पडले होते. गुलाब धांडू राठोड (४५, रा. पांगरा, जि. जालना) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर-छत्तीसगड येथून लोखंडी पोल घेऊन अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रक (एम.एच. १६ सी.डी. ९५५८) हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाचोडमधून जात होता. तेव्हा पैठणकडून आलेल्या दुचाकीला (एम.एच. २१ बी.ई. ०८४४) ट्रकने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील इसम उंच उडाला व ट्रकच्या टायरखाली आल्याने चिरडला गेला. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील त्या व्यक्तीचे शिर धडावेगळे झाले व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते, पोलीस हवालदार पवन चव्हाण, फिरोज बरडे व जीवन गुढेकर, होमगार्ड संतोष भुमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
सीमकार्ड टाकून नातेवाइकांना केला संपर्क
अपघातात मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटली नव्हती. त्याचा मोबाइलचा देखील चुराडा झाला होता. पोलीस जमादार सुधाकर मोहिते यांनी ठार झालेल्या व्यक्तीच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून त्यांच्या मोबाइलमध्ये टाकले. त्यानंतर काही नातेवाइकांशी संपर्क केला. काही वेळानंतर त्या इसमाची ओळख पटली. गुलाब धांडू राठोड (४५, रा. पांगरा, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाचोड पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हाण करीत आहेत.