भरधाव ट्रकने दुचाकी, कार आणि ट्रॅव्हल बसला उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:06 AM2021-01-21T04:06:26+5:302021-01-21T04:06:26+5:30

चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर मध्यरात्री विचित्र अपघात : सुदैवाने ट्रॅव्हल बसमधील २५ प्रवासी वाचले औरंगाबाद : ‘काळ आला होता; पण ...

The truck blew up a two-wheeler, a car and a travel bus | भरधाव ट्रकने दुचाकी, कार आणि ट्रॅव्हल बसला उडवले

भरधाव ट्रकने दुचाकी, कार आणि ट्रॅव्हल बसला उडवले

googlenewsNext

चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर मध्यरात्री विचित्र अपघात : सुदैवाने ट्रॅव्हल बसमधील २५ प्रवासी वाचले

औरंगाबाद : ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’ असे बुधवारी मध्यरात्री चुन्नीलाल पेट्रोल पंपासमोर झालेल्या विचित्र अपघातातून वाचलेल्या २५ प्रवाशांना पाहून म्हणावे लागेल. भरधाव ट्रकचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्यालगत उभी मोपेडला फरपटत नेले. त्यानंतर कारला धडकून उभ्या खाजगी ट्रॅव्हल बसला मागून धडक दिली. या विचित्र अपघातात बसमधील २५ प्रवाशांना किरकोळ मुका मार लागला.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, सिराज ट्रॅव्हलचा चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंपाजवळ पॅसेंजर पिकॲप पॉइंट आहे. जालना येथून मुंबईला निघालेली ट्रॅव्हल बस रात्री १२ वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेण्यासाठी या पिकअप पॉइंटवर थांबली होती. यावेळी बसमध्ये २५ प्रवासी बसलेले होते. शहादबिन हैदरा आणि सोहेल सिद्दीकी हे दोन तरुण त्यांची कार तेथे उभी करून ट्रॅव्हल कार्यालयाबाहेर उभे होते, तर हॉटेल वेटर असलेल्या नितीन श्याम वाघ (रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) या तरुणाने त्याची दुचाकी (एमएच-२० डीएएक्स-५०६१) तेथेच रस्त्याजवळ उभी करून ठेवली होती. १२.१५ वाजेच्या सुमारास क्रांतीचौक उड्डाणपूल ओलांडून सुसाट आलेल्या ट्रकचालकाने वाघ यांच्या दुचाकीला उडवून फरपटत नेले. यानंतर दुचाकीपासून काही अंतरावरील कारला मागून एका बाजूने जोराचा धक्का देत पुढे उभ्या ट्रॅव्हल बसला मागून धडक दिली. यावेळी बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ मुका मार लागला. मात्र, तिन्ही वाहनांचे जबर नुकसान झाले.

=========

दुचाकीचे दोन तुकडे

ट्रकच्या धडकेत वाघ यांच्या दुचाकीचे तुकडे झाले. वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आई- वडिलांनी मजुरी करून मला दोन वर्षांपूर्वी ही दुचाकी घेऊन दिली होती. आजच्या घटनेने आमचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले.

==================

ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने दारूच्या नशेत हा अपघात केला; अथवा त्याला डुलकी लागली किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले याविषयी घटनास्थळी चर्चा सुरू होती.

Web Title: The truck blew up a two-wheeler, a car and a travel bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.