पंढरपूरजवळ भरधाव ट्रकने मोपेडस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:19 PM2019-04-26T17:19:42+5:302019-04-26T18:19:36+5:30
मोपेडस्वार ट्रकखाली आल्याने गंभीर जखमी झाले
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पंढरपूरातील जामा मस्जिद समोर मोपेडस्वारास चिरडल्याची घटना शुक्रवारी (दि.२६ ) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात विठ्ठल श्रीपाद पोटदुखे (४० रा.कमळापूर फाटा) यांचा जागीच मृत्यू झाला तर समाधान यशवंत गव्हाणे (४१) हे गंभीर जखमी आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, समाधान यशवंत गव्हाणे (४१ रा.बोधवड ता.सिल्लोड) हे गुरुवारी (दि.२५) आपले मेव्हुणे विठ्ठल पोटदुखे यांना भेटण्यासाठी कमळापूर फाटा येथे आले होते. येथे मुक्काम केल्यानंतर आज सकाळी गव्हाणे परत निघाले. यावेळी पोटदुखे व गव्हाणे मोपेडवर ( एम.एच.२०, एफ.सी.२४३४) पंढरपूरच्या दिशेने निघाले
यावेळी पंढरपूरातील रांजणगावरोडवरुन जामा मस्जिदसमोर येताच वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने (एम.एच.१८, बी.जी.३९८९) मोपेडला समोरुन जोराची धडक दिली. यात पोटदुखे हे ट्रकखाली आले तर गव्हाणे दूर फेकल्या गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील दोघांनाही शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी पोटदुखे यांना तपासून मृत घोषित केले. समाधान गव्हाणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, अपघातानंतर पलायन करणाऱ्या ट्रक चालक मोहसीन यासिन शेख (रा.बडवाणी जि.सेंदवा, मध्यप्रदेश) यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.गणेश अंतरप हे करत आहेत.