उद्योगनगरीतील कामगार चौकात ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:10+5:302021-06-16T04:06:10+5:30

साथीदार थोडक्यात बचावला : मयत तरुणास २५ फुटापर्यंत फरफटत नेले सहकारी थोडक्यात बचावला : २५ फुटापर्यंत फरफटत नेल्याने तरुणाचा ...

A truck crushed a two-wheeler at Kamgar Chowk in Udyognagar | उद्योगनगरीतील कामगार चौकात ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

उद्योगनगरीतील कामगार चौकात ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

googlenewsNext

साथीदार थोडक्यात बचावला : मयत तरुणास २५ फुटापर्यंत फरफटत नेले

सहकारी थोडक्यात बचावला : २५ फुटापर्यंत फरफटत नेल्याने तरुणाचा चेंदामेंदा

वाळूज महानगर : भरधाव ट्रकने वळण घेणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण ट्रकच्या चाकाखाली सापडून त्याचा चेंदामेंदा झाला. औरंगाबाद-नगर महामार्गावरील कामगार चौकात सोमवारी (दि. १४) दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने तरुणास जवळपास २५ फुटापर्यंत फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्त-मांसाचा सडा पडला होता. सुदैवाने या अपघातात दुचाकीचालक थोडक्यात बचावला.

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकातून शेख फेरोज (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य एक तरुण दुचाकीने ( एम.एच.४१, ए.हच.८७४२) वाळूजकडे चालले होते. कामगार चौकातून वळण घेताना औरंगाबादकडून पुण्याकडे वायरचे बंडल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.१२, एफ.झेड.७७६३) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकीवर मागे बसलेला तरुण ट्रकच्या चाकाखाली सापडला तर दुचाकीस्वार शेख फेरोज हा दूर फेकला गेल्याने थोडक्यात बचावला. हा अपघात पाहताच कामगार चौकात कर्तव्य बजावणारे वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक ताहेर पटेल, पोहेकॉ केशव इधाटे, एम. आर. धोटे, पोना. शिवाजी छडीदार, पोकॉ रवींद्र कुरेवाड, पोकॉ मंजित जाधव आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने मृत अनोळखी तरुणास पोलीस वाहनातून शासकीय रुग्णालयात रवाना केले आणि ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी रस्त्यावरून हटविली.

चाकाखाली सापडलेल्या दुचाकीस्वार तरुणास ट्रकने जवळपास २५ फुटापर्यंत फरफटत नेले. त्यामुळे त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन रक्त व मांसाचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. या अपघातात दुचाकी चालविणारा शेख फेरोज (पूर्ण नाव माहीत नाही) दुचाकीवरुन दूर फेकल्याने थोडक्यात बचावला. पोलीस अपघातस्थळी मदतीत व्यस्त असल्याची संधी साधून किरकोळ जखमी झालेल्या शेख फिरोजने तेथून पलायन केल्याने मृताची ओळख पटू शकली नाही. ट्रकचालक बलवीरसिंग सीतारामसिंग भटिंग (२५, रा. पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांनी सांगितले.

नगर रोडवर अर्धा तास वाहतुकीची कोंडी

या अपघातामुळे औरंगाबाद-नगर रोडवर जवळपास अर्धा तास वाहतुकीची कोंडी होऊन १ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावर गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आल्याने जास्तच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्दन साळुंके, उपनिरीक्षक ताहेर पटेल व कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

खोदकामामुळे अपघाताचा धोका वाढला

औरंगाबाद-नगर रोडवर ए. एस. क्लबपासून नगरपर्यंत गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे. अपघातस्थळालगत खोदकाम केलेले असून मलबाही रस्त्यावरच पडला आहे. त्यामुळे नगर रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. खोदकाम करताना सुरक्षेविषयी काळजी घेतली जात नसल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

फोटो ओळ- औरंगाबाद-नगर रोडवरील कामगार चौकात अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी अशी गर्दी केली होती. इन्सॅटमध्ये अपघातास कारणीभूत ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी. तिसऱ्या छायाचित्रात या अपघातामुळे नगर रोडवर वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

----------------------

Web Title: A truck crushed a two-wheeler at Kamgar Chowk in Udyognagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.