२३ लाखांच्या कॉटन बेल घेऊन ट्रकचालक पसार; उद्योजकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:43 PM2021-06-02T18:43:59+5:302021-06-02T18:45:13+5:30
तक्रारदार निखिल कमल किशोर खंडेलवाल (४५, रा. दत्त कॉलनी, अकोला) हे कॉटन बेल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधून ट्रकमध्ये भरलेल्या २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किमतीच्या कॉटन बेल मध्यप्रदेशमधील कंपनीत न पोहोचवता चालकाने परस्पर गायब केल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिरोज मंनसोरी हमीद (रा. मोतीबाग मोहल्ला, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार निखिल कमल किशोर खंडेलवाल (४५, रा. दत्त कॉलनी, अकोला) हे कॉटन बेल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. चिकलठाणा एमआयडीसीतील एम.एस.डब्लू.सी. भांडारातून त्यांनी २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किमतीचा कॉटन बेल (१०० गठाण) माल मध्यप्रदेशातील बुधनी येथील ट्राईडेन्ट यारन कंपनीत पाठवायचा होता. यामुळे त्यांनी ट्रकचालक आरोपी फेरोज याच्याशी त्यांनी हा माल पोहोचविण्यासाठी भाडे करार केला. आरोपीने माल वेळेत पोहोचता करण्याची हमी तक्रारदार यांना दिली.
त्याच्यावर विश्वास ठेवून ४ मे रोजी रात्री ८ वाजता चिकलठाणा एमआयडीसीमधील गोडावून मधून आरोपीच्या ट्रकमध्ये (एम एच १८ बी ए ७८६१) माल भरला. यानंतर आरोपी फेरोज मालासह ट्रक घेऊन मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी रवाना झाला. तक्रारदार यांचा विश्वासघात करून हा माल तक्रारदार यांनी सांगितलेल्या कंपनीत त्याने पोहोचविला नाही. उलट तो मोबाइल बंद करून गायब झाला. ट्रकचालकाने आपला विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी रविवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात याविषयी तक्रार नोंदविली. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. फौजदार अमरनाथ नागरे तपास करीत आहेत.