६० लाखांची विदेशी दारू घेऊन ट्रकचालक पुण्याऐवजी गेला ‘संपर्क क्षेत्राबाहेर’
By सुमित डोळे | Published: August 18, 2023 08:25 PM2023-08-18T20:25:51+5:302023-08-18T20:26:13+5:30
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यातील एमआयडीसीतील युनायटेड स्पिरिट्स लि. या दारूच्या कंपनीतून तब्बल ६० लाखांच्या विदेशी दारूचे ९५० बॉक्स घेऊन पुण्यासाठी जाऊन अचानक ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ गेल्याने गोंधळ उडाला. नियमानुसार, दारूची वाहतूक करताना ठरवून दिलेला मार्गही चालकाला मनाने बदलता येत नसताना ट्रक व दारू गायब झाल्याने गोंधळ उडाला. ट्रान्सपोर्ट मालकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर चालक अक्षय प्रकाश सकत (रा. अहमदनगर) व मालक किशोर मारुती पडदुणे (रा. बजाजनगर) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजेंद्र विजयवर्गीय यांच्या कंपनीमार्फत त्या कंपनीचा माल मागणीनुसार पोहोचवला जातो. ९ ऑगस्ट रोजी कंपनीचे ५९ लाख १ हजार ३५३ रुपयांचे ९५० बॉक्स दारू घेऊन ट्रकचालक निघाला होता. पुण्याच्या वाळवेकर सन्स नाथ वेअरहाऊस येथे ती पोहोचवण्यास त्याला सांगण्यात आले होते. मात्र, १० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजूनही दारू संबंधित ठिकाणी पोहोचलीच नाही. विजयवर्गीय यांनी चालकाशी संपर्क साधला. चालकाने माझे नातेवाईक आजारी असल्याने अहमदनगरमध्ये थांबल्याचे सांगितले. विजयवर्गीय यांनी तत्काळ एका कर्मचाऱ्याला त्याने सांगितलेल्या जागेवर पाठवले असता तेथे ट्रक आढळून आला नाही.
चालकाने थाप मारल्याने विजयवर्गीय यांनी मालकाशी संपर्क साधला असता त्याने तेच उत्तर दिले. मात्र, दारू काही सापडली नाही. त्यामुळे विजयवर्गीय यांनी तत्काळ एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.