वाळूने भरलेला हायवा पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:06 AM2017-10-11T01:06:21+5:302017-10-11T01:06:21+5:30
वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा शहागड पोलीस चौकीतून पळवून नेल्याप्रकरणी मंगळवारी चार वाळू तस्कारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहागड : वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा शहागड पोलीस चौकीतून पळवून नेल्याप्रकरणी मंगळवारी चार वाळू तस्कारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहागडसह परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार सर्रास सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली असली तरी, पोलीस प्रशासनाने वाळू तस्करांवर कारवाई सुरू केली आहे. सोमवारी शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे यांनी कुरण शिवारात अवैध वाळू वाहतूक करत असलेला हायवा टिप्पर ( एमएच-४६ एफ.२३६० ) पकडला.
महसूल विभागाला याबाबत माहिती दिली. तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या पुढील कार्यवाहीसाठी टिप्पर शहागड पोलीस चौकीत लावला होता. दरम्यान, पंकज सोळूंके, ज्ञानेश्वर तांगडे, हनुमान गिरी, सुनील बोंबले (रा.सर्व गोंदी) यांनी रात्री अकरा ते सकाळी आठ दरम्यान नऊ लाख रुपये किंमत असलेला चोरीची वाळू भरलेला टिप्पर पळवून नेला. याप्रकरणी शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.