भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

By Admin | Published: September 18, 2016 01:54 AM2016-09-18T01:54:56+5:302016-09-18T01:59:24+5:30

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

The truck was hit by a truck by a farewell truck | भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

googlenewsNext

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. परिणामी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून, शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर त्यांच्या दोन चिमुकल्या मुली जखमी झाल्या. या भीषण अपघाताचे दृश्य पाहून संतप्त नागरिकांनी पळून जात असलेल्या ट्रकचालकाला चोप दिला आणि ट्रकवर दगडफेक केली.
फईम शेख (३५) आणि नसरीन फईम शेख (३०, रा. पारुंडी, ता. पैठण) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेत जरीन शेख (६) आणि फराहन (३) या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, फईम शेख हे पत्नी आणि दोन मुलींसह मोटारसायकलने पारुंडी येथून औरंगाबादला येत होते. सिग्मा हॉस्पिटल येथे त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. तर त्यांना उडविणारा ट्रक हा जालना येथून औरंगाबादमार्गे गुजरातला निघाला होता. फईम हे देवळाई चौकातून शहरात येण्यासाठी आपली दुचाकी वळवत असतानाच त्यांच्या मागून वेगात आलेल्या रिकाम्या ट्रकने (क्र. जीजेयू -६७७७) त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, फईम हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर आल्याने ते घटनास्थळीच ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या घटनास्थळी बेशुद्ध पडल्या होत्या. रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरीन आणि फराहन या मुलींना किरकोळ जखमा झाल्या असून, या भीषण अपघातात त्या बालंबाल बचावल्या.


ट्रकचालकास चोप आणि ट्रकवर दगडफेक
या अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ट्रकचालकास नागरिकांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी ट्रकचालक राजकुमार राधेश्याम यादव (रा. वापी, गुजरात) यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळी काही लोकांनी ट्रकवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या.
प्रत्यक्षदर्शी धावले मदतीला...
या अपघाताचे भयावह दृश्य पाहून अनेक जण मदतीला धावले. यावेळी फईम यांच्या मेंदूचा चेंदामेंदा झाल्याने ते जागीच गतप्राण झाल्याचे पाहून लोकांनी त्यांच्या प्रेतावर कपडा टाकला. तर गंभीर नसरीन आणि दोन्ही बालिकांना जखमी अवस्थेत उचलून रुग्णालयात पाठविले. देवळाई चौकातील दुकानदार आणि अन्य वाहनचालकांनी प्रथम घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठी गर्दी जमली होती.
अपघातानंतर वाहनांधारकांना घाईच....
अपघात घडल्यानंतर देवळाई चौकात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ट्रकखाली दबलेल्या मृताचे शव आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रत्यक्षदर्शी घाई करीत होते. या परिस्थितीतही काही वाहनचालक सिग्नल तोडून तेथून जाण्यासाठी घाई करीत होते. अत्यंत वर्दळीचा आणि दक्षिणेकडील शहराचे प्रवेशद्वार म्हणून देवळाई चौक ओळखला जातो. बीड बायपासच्या पलीकडे मोठी नागरी वसाहत निर्माण झाल्याने या चौकातून ये- जा करणाऱ्या वाहनचालकांची संख्याही वाढली आहे.
नागरिकांनी केली पोलिसांना मदत
अपघातामुळे काही काळ वाहने थांबविण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि काही वाहनचालक पुढे जाण्याची घाई करीत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी चौक परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून पोलिसांना मदत करून तेथील वाहनांचा मार्ग मोकळा केला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
दोन सहायक आयुक्तांसह पाच पोलीस निरीक्षक
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याचे कळताच वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, उस्मानपुरा विभागाच्या सहायक आयुक्त मकवाना यांच्यासह सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे, उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक सुरेश टाक, वाहतूक शाखेचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी ट्रकचालक राजकुमार यादव यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली.

Web Title: The truck was hit by a truck by a farewell truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.