पालक प्रवेश निश्चितीला गेले खरे, पण शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:03 AM2021-06-27T04:03:57+5:302021-06-27T04:03:57+5:30

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून ...

True, parents went to confirm admission, but the school closed | पालक प्रवेश निश्चितीला गेले खरे, पण शाळा बंद

पालक प्रवेश निश्चितीला गेले खरे, पण शाळा बंद

googlenewsNext

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या

औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून छाननी होऊन लाॅटरीत प्रवेशासाठी निवड झाली. प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांना शाळेत पाठविले. पालकांनी शाळा गाठली खरी, पण शाळा बंद होती. शाळा प्रशासन आर्थिक डबघाईमुळे शाळा बंद केल्याचे शाळा व्यवस्थापन सांगत आहे. तर शिक्षण विभाग रिक्त जागेवर प्रवेश देऊ असे म्हणत असून पालक मात्र, पाल्याच्या प्रवेशाच्या चिंतेत शिक्षण विभागात खेटे घालत आहेत.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. सातारा परिसरात सूर्यदीपनगर येथे इंग्लिश प्रायमरी स्कूल नावाच्या शाळेत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी शिक्षण विभागाने शाळेत जाण्यासाठी संदेश पाठविले. मात्र, पालक शाळेत पोहोचले तर शाळा बंद होती. परिसरातील नागरिकांकडून संपर्क साधला, तर त्या शिक्षकांनी पैठण गेट येथील संस्थेच्या कार्यालयात बोलावले. शेख असलम हुसेन, खान इरफानखान बाबरखान, मोरे गोरख साहेबराव यांनी प्रवेश निश्चितीबद्दल विचारले तर शाळा तोट्यात गेल्याने शाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून आरटीई सोडतीत निवड झालेल्या पाल्यांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. बंद केलेली शाळा सुरू करावी व त्या शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

--

१५ दिवसांत केवळ ९९ प्रवेश निश्चित

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जिल्ह्यातील आरटीईतून प्रवेशासाठी ६०३ शाळांमधील ३६२५ जागांसाठी ११ हजार ८११ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी सोडतीत ३४७० जणांची निवड करण्यात आली. त्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. धिम्या गतीने सुरू या प्रवेश प्रक्रियेत गेल्या १५ दिवसांत शनिवारपर्यंत ७४७ पाल्यांचे प्रोव्हिजनल, तर केवळ ९९ प्रवेश निश्चित झाले. याला प्रवेशप्रक्रियेला गती देण्याची मागणी आरटीई पालक संघाचे प्रशांत साठे यांनी केली आहे.

---

माझ्या मुलासह सहा विद्यार्थ्यांची सूर्यदीपनगर सातारा परिसरातील इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आरटीईतून प्रवेशासाठी निवड झाली. तिथे प्रवेश निश्चितीसाठी गेलो, तर शाळा बंद आहे. त्या संस्थेच्या व्यवस्थापनाला संपर्क साधला तर ते शाळा बंद केल्याचे सांगत आहेत. आता प्रवेशाचे काय होणार याची चिंता वाटतेय.

-असलम शेख, पालक

--

लाॅकडाऊन काळात पालकांनी शुल्क भरले नाही. आरटीईचा परतावा शासनाकडूनही मिळाला नाही. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे भाडे भरू शकलो नसल्याने शाळा बंद करावी लागली. शाळा चालवण्याची आर्थिक स्थिती नसल्याने शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.

- सोहेल अहेमद, अध्यक्ष, एकता सेवाभावी संस्था

---

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात प्रवेशाच्या प्रक्रियेसंदर्भात शाळांची नोंदणी केली त्यावेळी या संस्था सुरू होत्या. आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर २ ते ३ संस्था या बंद झाल्याचे आढळून आले आहे. तिथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांतील रिक्त जागांवर प्रवेशासाठी शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

-सूरजप्रसाद जयस्वाल, प्राथमिक विभाग, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

Web Title: True, parents went to confirm admission, but the school closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.