सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील
By बापू सोळुंके | Published: November 5, 2023 07:00 PM2023-11-05T19:00:17+5:302023-11-05T19:00:55+5:30
१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल असा, विश्वास आहे. पण दगाफटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नऊ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात एसईबीसी आरक्षण मिळावे, यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कार्यकक्षा राज्यव्यापी केली, राज्यसरकारच्या या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे, म्हणूनच आम्ही ५० टक्केच्या आत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आमची मागणी आहे.
राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडे वेळ मागितला. आम्हीही दोन महिन्यांचा वेळ दिला. सरकारवर विश्वास आहे का, असे विचारले असता, हो, सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. असे असले तरी दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही गाफील राहणार नाही. राज्यातील प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणात करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जेथे आंदोलन नाही, त्या गावांतही साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
१ डिसेंबरपासून मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात संवाद दौरा
जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी लाखोंच्या सभा झाल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्याने १ डिसेंबरपासून ते आता संवाद दौरा करणार आहेत. जरांगे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.