विकेंद्रित साठा निर्मितीचा प्रयत्न व्हावा
By Admin | Published: March 17, 2016 12:09 AM2016-03-17T00:09:09+5:302016-03-17T00:12:09+5:30
नांदेड :जलसंवर्धनासाठी कमी खर्चात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, पाण्याचा थेंबन्थेंब अडवून विकेंद्रित जलसाठ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील,
नांदेड :जलसंवर्धनासाठी कमी खर्चात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, पाण्याचा थेंबन्थेंब अडवून विकेंद्रित जलसाठ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले. नियोजन भवन येथे जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन कलश पूजनाने करण्यात आले.
गोदावरी पाटबंधारे आणि उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, व्ही. टी. तांदळे, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. तुकाराम मोटे, कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी, एस. एच. कचकलवार, एस. व्ही. पडलवार, एम. टी. लव्हराळे, बी. के. शेट्टे, मोहमंद जमील, आर. आर. बारडकर, एम. एल. उप्पलवाड, राजगिरे, शाहू यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन या बदलत्या शेतीच्या संकल्पनेमुळे खर्च वाढला. नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थित व्यवस्थापन न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे मृदसंधारण आणि जलसंधारण या दोन्हीवरही प्रतिकूल परिणाम झाला. भूगर्भातील पाण्याचा अमाप उपसा झाल्याने शेतीसाठीचे धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची वेळ आल्याचे जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले. त्यासाठी अभियंत्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील जलस्त्रोतांचे, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन व त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सूचित केले.
कृषी अधीक्षक मोटे यांनी माती व पाण्याचा अतुट संबंध असून त्यासाठी जलसंवर्धनासाठी मृदसंधारणाचाही प्राधान्याने विचार करावा असे सांगितले. प्रास्ताविकात अभियंता स्वामी यांनी केले़ जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांतून आणलेल्या पाण्याच्या कलशाचेही जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थितांना जलसंवर्धनासाठी जलप्रतिज्ञा देण्यात आली. (प्रतिनिधी)