लिंगायत समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न; मनोहर धोंडे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:13 PM2018-04-06T12:13:35+5:302018-04-06T12:15:47+5:30
लिंगायत धर्माची काही मंडळी महाराष्ट्रात सुपारी घेऊन काम करीत आहे, असा आरोप शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केला.
औरंगाबाद : लिंगायत धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा या नावाखाली वीरशैव लिंगायतांमध्ये फूट पाडण्याचे राजकीय षड्यंत्र सुरू आहे. लिंगायत धर्म म्हणून वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे करण्याचे षड्यंत्र कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने केले. त्यांच्या माध्यमातून लिंगायत धर्माची काही मंडळी महाराष्ट्रात सुपारी घेऊन काम करीत आहे, असा आरोप शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मन्मथधाम, मांजारसुंबा (जि. बीड), विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, राज्य उपाध्यक्ष शैलेश जक्कापुरे, औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुख अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, प्रभाकर पटणे, उमेश दारुवाले, प्रकाश पाटील, गजानन स्वामी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. धोंडे म्हणाले, वीरशैव लिंगायत धर्म ही संकल्पना शिवा संघटनेला मान्य आहे; परंतु लिंगायत धर्म ही संकल्पना संघटनेला मान्य नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहे. वीरशैव हा पुरातन, प्राचीन शब्द आहे तर लिंगायत हा अलीकडचा शब्द आहे; परंतु बुद्धिभेद करण्याचे काम सध्या सुरू आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने धर्मात नाक खुपसू नये, असेही ते म्हणाले.
केवळ अल्पसंख्याकची शिफारस
कर्नाटक सरकारने लिंगायत धर्म मान्य करा, अशी शिफारस केली नसून लिंगायत आणि वीरशैव लिंगायत यांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकात येदुयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्याने त्यांच्या मतामधील काही भाग घेण्यासाठी हे षड्यंत्र झाले आहे, असे प्रा. मनोहर धोंडे म्हणाले.
धर्मात फूट पाडत लिंगायत धर्माचे मोर्चा काढले जात आहेत. धर्म मान्यता, अल्पसंख्याक दर्जा गोंडस नाव देऊन फसवणूक केली जात आहे. लिंगायत धर्माला संघटनेचा विरोध आहे. कारण हा स्वतंत्र धर्म मिळू शकत नाही. स्वतंत्र धर्म मिळणार असेल तर वीरशैव लिंगायत धर्म म्हणून मान्य झाला पाहिजे, ही शिवा संघटनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले.