राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा गंगापुरात जाळून घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:34 AM2017-12-05T00:34:25+5:302017-12-05T00:34:32+5:30
गंगापूर येथे महावितरण कंपनीच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
गंगापूर : गंगापूर येथे महावितरण कंपनीच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सोमवारी दुपारी १२ वाजेदरम्यान हा प्रकार तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडला.
महावितरण कंपनीने शेतीपंपांची सुरु केलेली सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी तसेच रबीचा हंगाम पूर्ण होईपर्यंत शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये आणि जर वीजपुरवठा खंडित केला तर स्वत:ला जाळून घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी दिला होता.
ठरल्याप्रमाणे शिरसाठ यांनी पदाधिकारी व शेतकºयांसह तहसील कार्यालयाच्या गेटमधून न येता संरक्षक भिंतीवरून हातात रॉकेल व पेट्रोलने भरलेल्या बाटल्या घेऊन प्रवेश केला. या ठिकाणी शासन व महावितरण कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
घोषणाबाजी होत असल्याचे पाहून या ठिकाणी उपस्थित पोलीस कर्मचाºयांनी धाव घेतली. तोपर्यंत पदाधिकाºयांनी बाटलीमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले व आग लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच प्रसंगावधान राखून पोलिसांनी आंदोलकांच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या वेळी आंदोलक वाल्मिक शिरसाठ, सुर्यकांत गरड, खालेद नाहदी, विश्वजित चव्हाण, सुर्यकांत थोरात, अहमद पटेल, हनिफ बागवान, ज्ञानेश्वर डुकरे, नंदकुमार जाधव, बाळासाहेब कळसकर, अनिस कुरेशी, सलमान शेख, असिफ मन्सुरी, अमोल फुलारे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना अटक करून पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणले. नंतर सोडून देण्यात आले.