समाजमाध्यमावर पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:03 AM2021-03-10T04:03:27+5:302021-03-10T04:03:27+5:30
वाळूज महानगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा ...
वाळूज महानगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजापूर येथील सिराज शेख याने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्याशी संपर्क साधून, गावातील राजेश उगले याने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले होते. यानंतर सिराज शेख यास पोलीस ठाण्यात बोलावून सदरील पोस्टविषयी चौकशी केली. या चौकशीत सिराज यांनी त्यांचा भाऊ शफीक शेख यांच्या मोबाईलवर आलेली उगले याची पोस्ट दाखविली. या पोस्टमध्ये उगले याने स्वत:च्या आवाजातील व्हिडीओ क्लिप तयार करून ही वादग्रस्त क्लिप फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली. या वादग्रस्त पोस्टमध्ये साजापुरातील काही मुस्लिम समाजातील नागरिक आपणास मारहाणीच्या धमक्या देत असून वडगाव, तीसगाव व करोडी येथील नागरिकांनी मदत करावी, अशी दीड मिनिटाची पोस्ट उगले याने टाकली होती. या वादग्रस्त पोस्टची पोलिसांनी तपासणी केली असता, उगले याने समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आले.
याप्रकरणी सहायक फौजदार राजू मोरे यांच्या तक्रारीवरून उगले (३१ रा. साजापूर) याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार खंडागळे हे करीत आहेत.