आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:52 PM2019-02-24T23:52:55+5:302019-02-24T23:53:05+5:30
आचारसंहितेपूर्वी अधिकाधिक कामे मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस महापालिकेची आणखी एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
औरंगाबाद : आचारसंहितेपूर्वी अधिकाधिक कामे मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस महापालिकेची आणखी एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
महापालिकेच्या नगर सचिव कार्यालयाने या सभेची विषयपत्रिका नुकतीच काढली आहे. यामध्ये स्वच्छता अभियानाचा विषय ठेवण्यात आला आहे; परंतु सभेत इतरही अनेक महत्त्वाचे विषय पुरवणी विषयपत्रिकेत येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत याआधीच दोन सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. त्यानंतर आता या महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात आलेली ही तिसरी सभा आहे. नियमानुसार दर महिन्याला एक सभा घेणे बंधनकारक आहे; परंतु लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सभेत कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी राहिलेली कामे आणि निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलावण्यात आली आहे.
यापूर्वीच्या दोन्ही सभा ठेकेदारांची बिले, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरून गाजल्या आहेत. एकीकडे प्रत्येक सभेत तेच तेच प्रश्न मांडूनही ते सुटत नसल्याची ओरड नगरसेवकांतून होत आहे, तर दुसरीकडे विविध प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न होत आहे. गुरुवारी होणारी सर्वसाधारण आचारसंहितेपूर्वीची अखेरची सभा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यातून अधिकाधिक प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न होईल,असे दिसते.