पाणीपुरवठ्याच्या मुद्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 08:07 PM2018-10-01T20:07:32+5:302018-10-01T20:07:56+5:30
पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून मागील तीन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून मागील तीन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनामागे सेना-भाजप युतीचे नगरसेवक राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्याला महापालिका प्रशासनही तेवढ्याच ताकदीने साथ देत असल्याचे समोर येत आहे.
सिडको एन-३, एन-४ भागातील काही वसाहतींना पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून पाणी देण्याचा घाट रचण्यात आला. अगोदरच या पाण्याच्या टाकीवर प्रचंड लोड आहे. या भागातील नागरिकांचीच तहान भागत नाही. त्यात पुन्हा दूरच्या वसाहतींना पाणी देण्याचा आग्रह का आणि कशासाठी हे अनाकलनीय आहे. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीवरून एन-३ पर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास विरोध होणार हे सर्वश्रुत असतानाही मनपाने निविदा का काढली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यांपासून जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे प्रयत्न मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहेत.
प्रत्येक वेळी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना आपल्या हक्काचे पाणी पळविण्यात येत आहे, असे राजकीय मंडळीच सांगत आहेत. त्यामुुळे भोळी-भाबडी मंडळी चक्क रस्त्यावर उतरत आहे. शनिवारी तर या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना सर्व महत्त्वाची कामे सोडून पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. सिडको एन-३, एन-४ येथील नागरिकांना पाणी देऊ नका असे कोणीच म्हणणार नाही. पण त्यांना अगोदरपासूनच एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरून पाणी देण्यात येत आहे. आजही एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरून नागरिकांची तहान भागविणे सहज शक्य आहे. पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून पाणी देण्याचा आग्रह का? यामागे भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे.भाजपच्या राजकीय मंडळींनाही हा प्रश्न असाच तेवत ठेवायचा आहे. गणेश विसर्जन करणार नाही, म्हणून आंदोलन करणारेही भाजपचेच नेते होते.
आंदोलनाचे हत्यार
दूषित पाणी, कमी दाबाने पाणीपुरवठा आदी कारणांवरून जलवाहिन्या बदलण्याचे जवळपास ६४ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागत नसल्याने मागील तीन दिवसांपासून नगरसेवक नागरिकांच्या मदतीने आंदोलने करीत आहेत. पाणी प्रश्न सोडविण्यात नगरसेवकाला अपयश येत आहे. त्यासाठी नगरसेवक नागरिकांच्या मदतीने आंदोलन करून प्रश्न सोडवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.