खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 09:40 PM2019-05-14T21:40:13+5:302019-05-14T21:40:19+5:30
बजाजनगरातील मोहटादेवी व रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे.
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी व रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे. त्यासाठी या खदाणीत मुरुम-माती टाकुन त्या बुजविण्याचे काम खुलेआमपणे सुरु आहे. एमआयडीसी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने या खदानीवर अतिक्रमणे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बजाजनगरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या खदाणीच्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. विशेष म्हणजे या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी काहींनी ट्रॅक्टर, ट्रक व हायवाद्वारे मुरुम-माती आणून टाकली जात आहे. आजघडीला जवळपास २० एकर परिसरात ठिकठिकाणी मुरुम-मातीचे ढिगारे साचलेले दिसून येतात. मुरुम-माती टाकल्यानंतर खदाणीचे सपाटीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी बजाजनगर परिसरात सतत पाहणी करीत असतात. मात्र, खदानीवर होत असलेल्या अतिक्रमणाकडे या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
खदाणीच्या जागेवर उद्यान उभारणार
एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने या खदाणीच्या जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार वसाहतीत एकही खेळाचे मैदान नसल्याने बच्चे कंपनीला शहरातील उद्यानात जावे लागते. या संदर्भात मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावाही करण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.