टीटीसी सेंटर दौलताबादेतच; बिबट्या, माकड, मगरीसह वन्यजीवांवर होणार आधुनिक उपचार
By साहेबराव हिवराळे | Published: March 15, 2024 03:26 PM2024-03-15T15:26:02+5:302024-03-15T15:26:35+5:30
निधी आला, टेंडर निघाले : आठवडाभरात काम सुरू?
छत्रपती संभाजीनगर : ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर अभावी छत्रपती संभाजीनगर परिसरात गेल्या तीन वर्षांत किमान २५ बिबट्यांचा बळी गेलेला असून, उपचारासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागत होती. तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळलेल्या टीटीसी प्रकल्पास आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ११ कोटी २४ लाखांचा निधीही मंजूर झाला. शिवाय सेंटरसाठी दौलताबाद येथील जागेची निवड केल्याने प्रश्न मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाचे ८ कोटी १५ लाखांचे टेंडर निघाले आहे.
वन्यजीवांची गैरसोय टळणार
या दवाखान्यात अत्याधुनिक साधने उपलब्ध राहणार असून, उपचार आणि तपासणीही अत्यंत आधुनिक असेल. पशुवैद्यकीय स्टाफ आणि इलेक्ट्राॅनिक साधनांचा समावेश राहणार आहे. जखमी प्राण्यांवर नेमके उपचार आता सहज शक्य होतील. वन्यजीवांची योग्य देखभाल होईल.
-वन परिक्षेत्र अधिकारी ए.आर. पेहरकर
सा.बां. विभाग करणार काम
सा.बां. विभागाकडे निधी उपलब्ध झाला असून, सदर कामही मे. स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
-अनिल होळकर, शाखा अभियंता सा.बां. विभाग
लवकर काम सुरू व्हावे
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्राण्यांना वेळेत उपचार मिळण्याचे काम सुकर होणार आहे. लवकर कामाला सुरुवात करण्याची गरज आहे, असे मानद वन्यजीव सदस्य डाॅ. किशोर पाठक यांनी सांगितले.
टीटीसी सेंटर काय असणार
दौलताबाद येथे वनविभागात उपचारासाठी दाखल होणाऱ्या वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी स्पेशल प्रशिक्षित पशुवैद्यकीय टीम, कर्मचारी, पशूंना ने-आण करण्यासाठी वातानुकूलित रुग्णवाहिका, हॉस्पिटल इमारत, पोस्टमॉर्टेम रुम, बंदिस्त कुंपण घातलेली इमारत, प्रशासकीय इमारत, ट्रीटमेंट रुम, ओपन व नाइट शेल्टर इमारत आदींचा समावेश राहणार आहे.