आयटीआयचा तुघलकी कारभार; ३ तासांची प्रश्नपत्रिका, सोडवून घेतली ५० मिनिटांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:54 PM2021-03-31T12:54:38+5:302021-03-31T12:59:58+5:30
Tughlaq management of ITI आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
औरंगाबाद : आयटीआय केंद्रात मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ तासांऐवजी अवघ्या ५० मिनिटांत गुंडाळण्याचा तुघलकी कारभार मंगळवारी समोर आला आहे.
मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. संतापजनक प्रकार म्हणजे या ऑनलाइन परीक्षेचा अवधी ३ तासांचा होता. परीक्षा दुपारी २ ते ५ असा वेळ हॉल तिकिटावर देण्यात आला होता. आयटीआयच्या परीक्षा विभागाने दुपारी मुलांची ऑनलाइन परीक्षा सुरू केली. परीक्षा सुरू होताच २५ मिनिटांनी वीज गेली. वीज जाताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना केली की, वीज गेलेली असल्याने तुम्हाला केवळ २० मिनिटांमध्ये ऑनलाइन उत्तरपत्रिका सबमिट करावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता ३ तासांची प्रश्नपरीक्षा अवघ्या ५० मिनिटांमध्ये कशी सोडवावी? कारण त्यांचे प्रश्नसुद्धा पाहून झाले नव्हते. मुलांनी विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले संगणकाचा बॅकअप फक्त २० मिनिटे चालू शकतो. बॅकअप २० मिनिटांत संपला तर ऑनलाइन परीक्षेची उत्तरपत्रिका सबमिट करता येणार नाही आणि पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना अवघ्या ५० मिनिटांत पेपर सोडवायला लावला. लगेच विद्यार्थ्यांचे संगणक बंद करून त्यांना बाहेर हुसकावून लावले.
विद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते, एवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले. तीन तासांचा पेपर ५० मिनिटांमध्ये कसा सोडवता येईल. त्यामुळे आम्ही या परीक्षेत नापास होणार आहोत. त्यामुळे आजची घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा तीन तासांचा अवधी देऊन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. आयटीआय विभागाला कळायला हवे होते ऑनलाइन परीक्षा आहे. वीज गेली तर जेनरेटरची पर्यायी सोय करायला हवी होती. मात्र, ही सोय नसल्याने अडचण निर्माण झाली. आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.