ट्युशनची मुले गुंडगिरीकडे; छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी
By सुमित डोळे | Published: May 9, 2024 03:51 PM2024-05-09T15:51:55+5:302024-05-09T15:52:43+5:30
काही दिवासांपूर्वीच खुलेआम काढले होते शस्त्र
छत्रपती संभाजीनगर : ट्युशनसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठ्या-काठ्या, बेल्टसह तुंबळ हाणामारी करून एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना एन-१ मध्ये घडली. महावितरण कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ट्युशनचे ४० ते ५० विद्यार्थी व अन्य टवाळखोरांमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. आरडाओरडा व दगडफेकीमुळे स्थानिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी याच विद्यार्थ्यांच्या भांडणातून थेट चाकू काढले गेले. मात्र, ट्युशनच्या संचालकांकडून किंवा पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोरील एका खासगी क्लासेसचे काही विद्यार्थी गणवेशात मॉस्को कॉर्नर परिसरात जमा झाले होते. थोड्याच वेळात काही बाहेरील टवाळखोरही तेथे दाखल झाले. एकमेकांना मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू करून त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. लाठ्या-काठ्यांसह एकमेकांना ते बेल्टने मारहाण करीत होते. त्यातील काहींनी एकमेकांना दगड फेकून मारण्यास सुरुवात केल्याने नागरिक घराबाहेर आले. यातील काही दगड नागरिकांच्याही घरावर गेले. स्थानिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्यानंतर मात्र सर्वांनी पोबारा केला.
वाद, हाणामाऱ्यांची पार्श्वभूमीच; शस्त्रही उपसले
काही दिवसांपूर्वीच ट्युशनचे विद्यार्थी व बाहेरील टवाळखोरांमध्ये ट्युशनच्या समोरच हाणामारी होऊन थेट चाकू काढले गेले होते. स्थानिकांनी याचे मोबाइलमध्ये चित्रण करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना धमकावण्यातदेखील आले. काही महिन्यांपूर्वीच याच ट्युशनसंबंधित एका विद्यार्थिनीच्या वादातून दोन मुलांचे अपहरण करून मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, बुधवारच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.