चड्डी गँगचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:49 AM2017-07-23T00:49:35+5:302017-07-23T00:50:04+5:30
कोळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेवराई तालुक्यातील सावरगाव व भडंगवाडी येथील दोन वस्त्यांवरही चड्डी गँगने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली. त्यांनी रहिवाशांना मारहाण करून हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
गेवराई तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. सावरगाव येथील आंधळे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी चोरी केली. संदीप आंधळे यांच्या घरातील सुभद्रा धोंडीराम आंधळे, सुनीता शहादेव आंधळे या दोन महिलांचे दागिने लंपास केले. त्यानंतर या गँगने आपला मोर्चा भडंगवाडीकडे वळविला. येथील निकम वस्तीवरील शिवाजी अंबादास निकम, दिलीप अंबादास निकम या दोन भावांना त्यांनी मारहाण केली. शिवाजी निकम यांच्या डोक्याला मार लागल्याने चार ते पाच टाके पडले, तर दिलीप निकम यांच्या हाताला मार लागला आहे. एवढ्यावरच न थांबता या चोरांनी पुष्पा शिवाजी निकम, आशा दिलीप निकम यांनाही मारहाण केली. निकम यांनी आरडाओरडा करताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
एकाच रात्री दोन घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.