कडधान्याच्या आयातीमुळे तूर हमीभावापासून वंचित : राजू शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 07:32 PM2020-02-10T19:32:50+5:302020-02-10T19:35:56+5:30

हमीभाव, बाजार भावातील तफावत केंद्राने थेट द्यावी 

Tur deprived of guarantee rate due to import of pulses: Raju Shetty | कडधान्याच्या आयातीमुळे तूर हमीभावापासून वंचित : राजू शेट्टी 

कडधान्याच्या आयातीमुळे तूर हमीभावापासून वंचित : राजू शेट्टी 

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या.

औरंगाबाद : केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कडधान्याची आयात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी, बाजारपेठेत हमीभावापेक्षा तूर क्विंटलमागे १५०० रुपये कमी भाव मिळत आहे. ही तफावतीची रक्कम केंद्र सरकारकडून वसूल करण्यात यावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण बांधणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. पूर्वीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. या अंतर्गत आज औरंगाबादेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल ठरविला आहे. मात्र, प्रत्यक्षात अडत बाजारात तूर ४३००  ते ४४०० रुपये क्विंटलने विकत आहे. क्विंटलमागे १५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण केंद्राने १५ लाख टनाहून २३ लाख टनापर्यंत कडधान्याची आयात वाढविली आहे. यामुळे तुरीचे भाव घसरले आहेत. जर आयात झाली नसती तर आज तुरीला क्विंटलमागे ६५०० रुपये भाव मिळाला असता. एकरी ७ क्विंटल तूर उत्पादन होते. शेतकऱ्यांना एकरी १५ हजार ४०० रुपयांचा फटका बसत आहे. तफावतीची रक्कम राज्य शासनाने केंद्र सरकारकडून वसूल करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.  

महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या. मुख्यमंत्री होण्याआधी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन आले होते. शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते आश्वासन हवेतच विरले. तुटपुंजी कर्जमाफी केली त्याचा फक्त प्रत्येक गावातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच फायदा झाला. उर्वरित ८५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून, सातबारा कोरा करा, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. २२ फेब्रुवारी रोजी शिर्डीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी सूर्यकांत तुपकरी यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. 

...तर कापूस उत्पादकांना देऊ साथ 
राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली की, मराठवाड्यातील कापूस उत्पादक आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत नाहीत. जर कापूस उत्पादक रस्त्यावर उतरले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना साथ देईल.

स्वाभिमानी संघटना मनपा निवडणूक लढविणार 
राजू शेट्टी यांनी जाहीर केले की, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढविणार आहे. सध्या ६ ते ७ उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. चांगले उमेदवार भेटले तर आणखी जागा लढवू. पाणी, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्यांकडे आम्ही शहरवासीयांचे लक्ष वेधू, असेही त्यांनी नमूद केले. 

घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीस पाठिंबा 
बांगला देश, पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. मात्र सीएए, एनआरसीला आमचा पाठिंबा नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे चुकीचे
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकरी शेतीमाल विक्री करतात, त्यांना तेथील संचालक मंडळ निवडीचा अधिकार दिला पाहिजे. आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला. शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जात नसल्याने भाजप सरकारने संचालक मंडळ निवडीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.  

Web Title: Tur deprived of guarantee rate due to import of pulses: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.