मिटमिटा दंगल प्रकरण : दिड हजार नागरिकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगलीचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 07:15 PM2018-03-08T19:15:17+5:302018-03-08T19:16:31+5:30
आप्पावाडी येथील एका जागेवर शहरातील कचरा नेऊन टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जाणार्या ट्रक अडवून मिटमिटा येथील हजारो नागरीकांनी बुधवारी जोरदार दगडफेक आणि जाळापोळ केली होती.
औरंगाबाद: मिटमिटा आणि पडेगाव येथे बुधवारी दुपारी झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दिड हजार नागरीकांवर पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगल करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले. याप्रकरणी छावणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत २८ जणांना अटक केली.
याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की, आप्पावाडी येथील एका जागेवर शहरातील कचरा नेऊन टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्तात जाणार्या ट्रक अडवून मिटमिटा येथील हजारो नागरीकांनी बुधवारी जोरदार दगडफेक आणि जाळापोळ केली होती. या घटनेत पोलीस अधिकारी कर्मचारी गंभीर जखमी झाले. जमावाने केलेल्या दगडफेकीत मनपाच्या दोन ट्रक जाळण्यात आल्या आणि सरकारी आणि खाजगी वाहनांची तोडफोड जमावान केली होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविले आणि नंतर पोलीस बंदोबस्तात कचर्यांच्या गाड्या आप्पावाडी येथे नेल्या.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन मिरधे यांच्या तक्रारीवरून सुमारे हजार ते दिड हजार नागरीकांवर पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हे नोंदविले. या गुन्ह्यात पोलिसांनी २४ जणांना ताब्यात रात्री अटक केली. पडेगाव येथील मच्छिंद्रनाथ मंदीरासमोर बुधवारी सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार प्रदीप जैस्वाल आणि मनपाचे अधिकारी हे नागरीकांना समजावून सांगत असताना पुन्हा तेथे जमाव आणि पोलिसांत राडा झाला. यावेळी जमावाने पुन्हा एक वाहन पेटवून दिले होते.
या प्रकरणी मनपाच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल करणे, मालमत्तेचे नुकसान करणे,जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमानुसार सुमारे १०० ते १५०नागरीकांवर हा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली.