वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:38 PM2019-01-24T13:38:07+5:302019-01-24T13:38:29+5:30

गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वीस तासांचे भारनियमन सुरु आहे

Turn off the load shading for 20 hours; Otherwise, stop the water supply of industries | वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

googlenewsNext

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू केलेले वीस तासांचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२३ ) रात्री विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर नाईलाजाने जायकवाडीतुन उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

गोदापात्रातून होणारा अधिकृत पाणीउपसा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज फक्त चार तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिल्याने  बॅकवॉटर परिसरात महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून दररोज वीस तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. वीज पुरवठा कमी केल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक पाण्याअभावी  वाया जाण्याची भीती आहे. 

याबाबत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेतली.  चार तास होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी पिकं कशी जतन करावी असा सवाल विभागीय आयुक्तांना विचारण्यात आला. गहू, ज्वारी, कांदा, आणि चारा पिके यांना जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज आवश्यक आहे. या भागातील  शेतकऱ्यांनी कर्ज काढुन पीके उभी केली असून पाण्याअभावी ही पिके हातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले.

प्रशासनाने तात्काळ आठ तासांचा सुरळीत वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेतीला उद्योगाच्या अगोदर प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ महावितरण आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन आयुक्त भापकर यांनी दिले. 

या वेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, शेकापचे महेश गुजर, मिलिंद पाटील, शेतकरी नेते पी.आर.जाधव, संजय गायकवाड, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, पांडुरंग चव्हाण, राहुल पारखे, सर्फराज पठाण, बाबुराव केकते, संतोष एरंडे आदींसह गंगापूर आणि पैठणचे शेतकरी हजर होते.

Web Title: Turn off the load shading for 20 hours; Otherwise, stop the water supply of industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.