जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठिशी आहे याची प्रचिती येईल: प्रकाश आमटे
By गजानन दिवाण | Updated: January 17, 2025 19:59 IST2025-01-17T19:55:18+5:302025-01-17T19:59:19+5:30
१८ वर्षांवरील निराधार युवक-युवतींसाठीच्या ‘युवाग्राम’चे भूमीपूजन; संभाजीनगरकरांच्या सामाजिक जाणिवेला पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा सलाम

जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठिशी आहे याची प्रचिती येईल: प्रकाश आमटे
छत्रपती संभाजीनगर : जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठिशी आहे याची प्रचिती येईल, असे बाबा नेहमी सांगायचे. हे धाडस संतोष-प्रीती या दाम्पत्याने दाखवले. समाजानेदेखील आम्ही तुमच्या पाठिशी आहोत हे दाखवून दिले. आजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती हेच दर्शवते, असे उद्गार पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी शुक्रवारी येथे काढले.
शहराजवळील शरणापूर येथे शुक्रवारी १८वर्षांवरील निराधार युवक-युवतींसाठीच्या ‘युवाग्राम’ प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. मंदाताई आमटे, प्रसिद्ध उद्योजक राम भोगले, एमआयटीचे संस्थापक डॉ. यज्ञवीर कवडे आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई यांची मुलाखत प्रा. समाधान इंगळे यांनी घेतली. या मुलाखतील आमटे यांनी प्रेम विवाहापासून आदिवासींसाठी उभारलेला हेमलकसा प्रकल्प, ॲनिमल आर्क याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, बाबांनी मोठा सामाजिक वसा आम्हाला दिला. मी डॉक्टर झालो त्यावेळी त्यांनी कुटुंबाची सहल काढली. बाबा वयाच्या साठीत असतील.आम्हाला त्यांच्या या सहलीच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. ते आम्हाला गडचिरोलीला घेऊन गेले. नदीच्या पाण्यातून वगैरे मोठा प्रवास केल्यानंतर आम्ही स्थानिकांना बोलण्याचा प्रयत्न केला.थंडीचे दिवस होते. आम्ही कपडे आणि त्यावर स्वेटर घालून त्यांच्यासमोर उभे होतो. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आमच्या गाड्या पाहून ते पळू लागले. भाषेची अडचण असल्याने बोलणे दूरच ते थांबतही नव्हते. माणसाने माणसांनाच भ्यावे असे कसे हे जग, हा प्रश्न मला त्यावेळी पडला. असे प्रश्न पडावेत हा बाबांचा या सहलीचा उद्देश होता. मी याच लोकांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करणार हा शब्द मी बाबांना दिला आणि तो पाळला. अशी कुठली सामाजिक परंपरा संतोष-प्रीती यांच्या कुटुंबात नाही. त्यानंतरही त्यांनी हे धाडसाचे पाऊल टाकले ही फार गोष्ट आहे, अशा शब्दांत आमटे यांनी गर्जे दाम्पत्याचे कौतुक केले.
प्रकाशभाऊ-मंदाताईंचा प्रेमविवाह
प्रेमविवाहाच्या आठवणी सांगताता डॉ. आमटे म्हणाले, ‘माझी आणि मंदा यांची ओळख डॉक्टरकीचे शिक्षण घेताना झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रमात झाले. मी पहिल्याच दिवशी सांगितले.लग्नानंतर आपल्याला आदिवासींमध्ये जाऊन राहायचे आहे. तिथेच काम करायचे आहे. हे मान्य असेल तर पुढ जाऊ. क्षणाचाही विलंब न करता तिने होकार दिला. लग्नानंतर अनेक वर्षे आम्ही कुडाच्या झोपडीत राहिलो. साधारण १८वर्षे वीज नव्हती. मराठी बोलणारेही कोणी नव्हते. मनोरंजानाचे साधान नव्हते. या सर्व काळात तिने मला साथ दिली.’ मंदाताई म्हणाल्या, ‘आम्ही स्वत:हून हे स्वीकारले आहे. त्यामुळे हे करण्यातच अगदी पहिल्या दिवसापासून आनंदच मिळाला आहे. जे आम्ही स्वीकारले तेच माझ्या मुलाने णि पुढे सुनेनेही स्वीकारले आहे. तेच आता ‘हेमलकसा’ची जबाबदारी सांभाळतात. म्हणून आम्ही दोघे बाहेर फिरु शकतो.’
‘युवाग्राम’ला आत्मनिर्भर करा -भोगले
युवक-युवतींना केवळ राहण्याचे ठिकाण देऊन न थांबता त्यांना स्वत:च्या पायावर उभे करा. कौशल्य विकासाचे धडे त्यांना द्या. ते आत्मनिर्भर होतील, त्यावेळी ‘युवाग्राम’ही आत्मनिर्भर होईल, असा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांनी यावेळी दिला. प्रमुख पाहुणे डॉ. यज्ञवीर कवडे यांनी ‘युवाग्राम’ संकल्पनेचे कौतुक केले. शक्य तेवढे सहकार्य आम्ही करु असा शब्द त्यांनी यावेळी दिला. उद्योजक प्रशांत देशपांडे, वास्तुविशारद अजय कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. हेरिटेज वारसा असलेल्या या परिसराला शोभेल अशीच वास्तू ‘युवाग्राम’ची असेल, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. प्रस्तावना संतोष गर्जे यांनी केली. आभार प्रीती गर्जे यांनी मानले.
बालग्राम ते युवाग्रामचा प्रवास
संतोष आणि प्रीती गर्जे या दाम्पत्याने निराधार मुलांसाठी गेवराईजवळ ‘बालग्राम’ उभारले. सध्या या ठिकाणी १०७मुले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या निराधारांनी कोठे जायचे या विचारातून गर्जे दाम्पत्याने ‘युवाग्राम’ जन्माला घातले. सध्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या युवाग्रामच्या इमारतीचा भूमीपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. या युवक-युवतींना केवळ राहण्याचे ठिकाण नाही तर कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी ‘युवाग्राम’ पार पाडेल. शासनाचे एक पैशाचे अनुदान नाही. तरीही समाजातील सर्व घटकांनी ‘बालग्राम’ला उभे केले. सामाजिक भान असलेल्या याच हातांनी मला ‘युवाग्राम’ उभारण्याचे धाडस दिले. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर ‘युवाग्राम’ या युवकांना एक चांगला माणूस म्हणून समाजात उभे करेल, असा विश्वास संतोष गर्जे यांनी व्यक्त केला.